मुंबई : ‘सेव्ह द चिल्ड्रन’ या सामाजिक संस्थेने मोबाइल लर्निंग सेंटरच्या उपक्रमातून, मुंबईतील १ हजार २०० मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची किमया केली आहे. यातून इतरांनाही प्रेरणा मिळावी, म्हणून संस्थेने या उपक्रमात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या कथांवर एक पुस्तिका तयार केली आहे. त्याचे प्रकाशन मंगळवारी प्रेस क्लबमध्ये झाले.‘मूव्हिंग आॅन विथ एज्युकेशन’ असे पुस्तिकेचे नाव आहे. संस्थेच्या नियामक परिषद सदस्य स्वरूप संपत म्हणाल्या की, ‘सेव्ह द चिल्ड्रनचे ध्येय जगाचा मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे, त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविणे, हे आहे. प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना शाळेनंतरच्या वेळेत अभ्यास करण्यास मदत झाली, तसेच पालकांचे समुपदेशन करून त्यांना त्यांच्या पाल्यांना सेंटरमध्ये पाठविण्यास उद्युक्त केले आहे.’ या प्रकल्पाचा लाभ घेतलेली राशमा खान ही विद्यार्थिनी म्हणाली की, ‘कुटुंब अनेक संकटांशी झगडत असताना शिक्षण घेणे अशक्य वाटत होते. मात्र, संस्थेने दिलेल्या शिक्षणामुळे आता उज्ज्वल भविष्य पाहू शकते.’संस्थेच्या राज्य प्रकल्प व्यवस्थापक संध्या कृष्णन म्हणाल्या की, ‘या प्रकल्पांतर्गत तयार केलेली ब्ल्यू बस मुलांसाठी सुरक्षित आणि त्यांना आवडेल, असे वातावरण त्यांच्या घराच्या आसपास उपलब्ध करून देते. त्यामध्ये बसून मुलांनाही शिक्षण घेण्याची मजा वाटते.’ (प्र्रतिनिधी)
मोबाइल लर्निंग सेंटरमधून शिक्षणप्रसार
By admin | Updated: October 28, 2015 00:10 IST