मुंबई : महापालिका शाळेतील शिक्षक गुणवंत विद्यार्थ्यांना घडविण्यासोबतच, त्यांना मूल्यशिक्षणाचे धडे देतात. या शिक्षकांमध्ये गुणवत्ता ठासून भरली असून, गुणवंत विद्यार्थ्यांसोबत महापालिकेचे शिक्षकसुद्धा अभिनंदनास पात्र आहेत. विद्यार्थ्यांची जडणघडण करणाऱ्या आईवडिलांसोबत जीवनाचा खरा मार्ग दाखविणारे शिक्षकसुद्धा भगवंत असतात, असे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले.माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च-२०१८ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दादर (पूर्व) येथील राजा शिवाजी विद्या संकुलातील प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृहात आयोजित करण्यात आला होता, या वेळी महापौर बोलत होते. या कार्यक्रमाला उपमहापौर हेमांगी वरळीकर, आमदार कालिदास कोळंबकर, सिनेअभिनेता सुशांत शेलार, शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर आदी उपस्थित होते.अभिनेता सुशांत शेलार या वेळी म्हणाले की, ‘महापालिका शाळांमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण देण्याची इच्छा असून, यासाठी मराठी सिनेक्षेत्रातील कलावंत सहकार्य करण्यास तयार आहेत.’
महापालिका शाळेतील शिक्षकही ‘गुणवंत’- महापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 03:51 IST