Join us

मार्चचे वेतन न झाल्याने शिक्षकांची आर्थिक काेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार उशिरा होत आहेत. मार्च २०२१चे वेतन देण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार उशिरा होत आहेत. मार्च २०२१चे वेतन देण्यात तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत, तसेच वेतन अनुदानही उपलब्ध नाही. शिक्षण विभाग आणि वित्त विभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्याने पैसे येऊनही वित्त विभागाने बिले नाकारली असून, याबाबतीत शिक्षण संचालकांनी पत्र लिहिले आहे. परंतु, अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शिक्षकांची आर्थिक काेंडी झाल्याचा आराेप शिक्षक आणि शिक्षक संघटनांनी केला आहे.

कोविड काळात अनेक ठिकाणी शिक्षक, शिक्षकेतरांचे मृत्यू झाले आहेत. अनेकजण कोविडग्रस्त असून, उपचारासाठी मोठा खर्च होत आहे. कोणाचे कर्जाचे हप्ते थकले असून, दंड, व्याज भरावे लागत आहे. अशा परिस्थितीत शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिक्षकांना वेतनही वेळेवर मिळत नसल्याची खंत शिक्षकांसह शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे.

शिक्षकांचे पगार न होण्यासाठी अनेक तांत्रिक बाबी सांगितल्या जात आहेत. मात्र, या सर्वांचा फटका शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसत आहे. शिक्षण विभागाने तांत्रिक अडचणी दूर न केल्याने बॅंकेला निधी वितरणाची अडचण येत असल्याची माहिती शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांनी दिली.

जिल्हा अधिदान व लेखा कार्यालयाने काही त्रुटी दाखवून वेतनबिले परत केली आहेत. जिल्हापरत्वे वेगवेगळ्या त्रुटी दाखविण्यात येत असल्याची माहिती राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली. त्यांनी या संदर्भात शिक्षण विभाग, वित्त विभाग व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र लिहिले आहे. लाखो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मार्च २०२१च्या वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. वेतन होण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा कोषागारांना सरकारने निर्देश द्यावेत, शालार्थ व बीम्स (बीईएएमएस) प्रणाली शालेय शिक्षण विभाग व वित्त विभाग यांच्या समन्वयाने लवकरात लवकर अपडेट करून घेण्याच्या सूचना द्याव्यात. त्यामुळे पुढील महिन्यांच्या वेतनाला विलंब होणार नाही, असेही दराडे यांनी शासनाला सुचवले आहे.

......................