Join us  

भारत - पाकिस्तानमधील शांततेसाठी शिक्षकांचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 12:29 AM

भारत-पाकिस्तानातील सध्याचा संघर्ष हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. या दोन्ही देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे सीमा भागातील शाळा बंद ठेवल्या जात आहेत.

मुंबई : भारत-पाकिस्तानातील सध्याचा संघर्ष हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. या दोन्ही देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे सीमा भागातील शाळा बंद ठेवल्या जात आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही देशांमधील विद्यार्थ्यांमध्ये सौहार्दाचे संबंध निर्माण करण्यासाठी पीस आर्मीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून ३ मार्च रोजी भारत व पाकिस्तानच्या शिक्षकांचे विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. एकूण ५ अभ्यासकांनी या सत्रात आपले विचार मांडले. भारताच्या वतीने रणजीतसिंह डिसले व निरु मित्तल यांनी तर रजा वकास व मधीहा झैन यांनी पाकिस्तानच्या वतीने आपले विचार मांडले.शिक्षणाच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करून शांतताप्रिय नागरिकांची जडणघडण करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या ‘लेट्स क्रॉस द बॉर्डर’ या शैक्षणिक प्रोजेक्टचा एक भाग म्हणून हे सत्र आयोजित केले होते. सोलापूर जिल्हा परिषदेत कार्यरत शिक्षक रणजीतसिंह डिसले यांच्या लेट्स क्रॉस द बॉर्डर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील शिक्षकांनी आत्ताच्या दोन्ही देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा आढावा घेतला.भारतीय प्रमाणवेळेनुसार ३ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता हे चर्चासत्र सुरू झाले असून या वेळी फिनलँडचे शिक्षक पेक्का ओली यांनीही ‘शांततामय शिक्षण’ याविषयी आपले विचार मांडले.>खाद्य संस्कृती, भाषा, शिक्षण यांसारख्या अनेक गोष्टींत भारत आणि पाकिस्तान यांच्यात साम्य आहे. एकमेकांच्या वैज्ञानिक तज्ज्ञांच्या आणि शैक्षणिक तज्ज्ञांच्या साहाय्याने अनेक नवीन गोष्टी ते घडवीत असतात. आपण शेजारी देश असून आपल्याला युद्ध नको तर शांती हवी असल्याचा संदेश आपण जगातील इतर देशांना द्यायला हवा.- रजा वकास, रुट्स मिलेनियम स्कूल, पाकिस्तान