Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांमुळे शिक्षिकेचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: December 5, 2014 01:30 IST

बँकेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी दाद मागण्यासाठी गेलेल्या शिक्षिकेला नेरूळ पोलिसांनी मदत करण्याऐवजी उद्धट वागून चक्क हाकलून लावले

मनीषा म्हात्रे, मुंबईबँकेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी दाद मागण्यासाठी गेलेल्या शिक्षिकेला नेरूळ पोलिसांनी मदत करण्याऐवजी उद्धट वागून चक्क हाकलून लावले. यामुळे निराश झालेल्या शिक्षिकेने माहीम येथे राहाणाऱ्या आई-वडिलांच्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच उपचार मिळाले नसते तर कदाचित शिक्षिकेचा मृत्यू झाला असता. तूर्तास या प्रकरणी माहिम पोलिसांनी शिक्षिकेचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्यात नेरूळ पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकाऱ्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत.रेश्मा वाघमारे असे या शिक्षिकेचे नाव आहे. त्या गिरगाव येथील चंदारामजी शाळेत शिकवतात. बँक आॅफ इंडियाच्या गिरगाव शाखेत त्यांचे सॅलरी अकाऊन्ट आहे. २८ नोव्हेंबरला रेश्मा यांचा सव्वा आठ लाखांचा चेक व्यवहाराकरता शाखेत आला. या चेकवर संगीता शेट्ये या महिलेचे नाव लिहिलेले होते. चेकनुसार बँकेला रेश्मा यांच्या खात्यातून ही रक्कम रेश्मा यांच्या खात्यात वळती होणार होती. व्यवहाराआधी बँकेने या चेकबाबत रेश्मा यांना एसएमएसवरून सूचित केले. या एसएमएसमुळे त्यांना धक्का बसला. संगीता यांच्याशी त्यांचा कोणताही व्यवहार नव्हता. तसेच हा चेक संगीता यांच्या नावे दिलेला नसताना तो बँकेत कसा काय पोचला, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी बँकेत धाव घेतली. तेव्हा बँकेने व्यवहार रद्द केला. मात्र पुन्हा चार दिवसांनी तितक्याच रक्कमेचा, संगीता याच नावे दुसरा चेक बँकेकडे आला. तोही रेश्मा यांच्या सांगण्यानुसार रद्द केला गेला. अखेर बँकेच्या सांगण्यावरून रेश्मा यांनी नेरूळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.काल दुपारी साडे बाराच्या सुमारास रेश्मा नेरुळ पोलीस ठाण्यात धडकल्या. मदत करण्याऐवजी तेथे कर्तव्यास असलेल्या अधिकाऱ्यांनी रेश्मा यांनाच दमदाटी सुरू केली. तब्बल चार तास त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. चारच्या सुमारास फौजदार गायकवाड तेथे आले. त्यांनी रेश्मा यांच्या पतीवर संशय घेतला. पतीनेच तुमचे चेक संगीताला दिले नाहीत कशावरून, असा सवाल गायकवाड यांनी करताच रेश्मा भडकल्या. तेव्हा गायकवाड यांनी रेश्मा यांना पोलीस ठाण्याबाहेर हाकलले. हा सर्व घटनाक्रम रेश्मा यांनी माहिम पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केला आहे. रेश्मा माहिम येथे राहणाऱ्या आई-वडिलांकडे आल्या. आठ लाख खात्यातून वळते झाले तर मुलांंच्या पुढील आयुष्याचे काय होणार, या विचाराने त्या व्यतिथ झाल्या. अखेर मीच या जगातून गेले तर खात्यातून पैसे जातीलच कसे या कल्पनेने त्यांनी पहाटेच्या सुमारास फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे त्यांना उलट्या सुरू झाल्या. हा प्रकार आईच्या लक्षात येताच रेश्मा यांना वांद्रे भाभा रूग्णालयात दाखल करण्यात आले. वेळीच उपचार मिळाल्याने जीव वाचला, असे डॉक्टरांनी‘लोकमत’ला सांगितले. संबधित अधिकाऱ्यांशी बोलून प्रकरणाची माहिती घेऊ, नेरूळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक संगीता अल्फान्सो यांनी सांगितले.