मुंबई : शाळा नशेच्या विळख्यात या टीम लोकमतच्या रिअॅलिटी चेकने घराघरात चिंतेचे वातावरण होते़ पालकांनी फोन करून लोकमतचे आभार मानले व सरकारविरोधात संपात व्यक्त केला़ शिक्षकांनीही नाव न छापण्याच्या अटीवर टपऱ्यांविरोधात रोष व्यक्त केला़ लोकप्रतिनिधींनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे लोकमतला सांगितले़ मात्र मुंबई विडी तंबाखू विक्रेता संघाने शाळेजवळील गेली अनेक दशके असलेल्या पान टपऱ्यांवर कारवाई न करण्याची भूमिका मांडली आहे़ लोकमतने केलेले स्टिंग आॅपरेशन हे पालकांसाठी जळजळीत अंजनच आहे़ पण भावी पिढीला वाचविण्यासाठी त्यांचे कुटुंबीयच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकाही जबाबदार आहे़ शालेय विद्यार्थ्यांना व्यसन लावणाऱ्या दुकानांचे परवानेच पालिकेने रद्द करायला हवेत़ - देवेंद्र आंबेरकर, विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका लहान मुलांना तंबाखूजन्य पदार्थांपासून परावृत्त करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत विविध माध्यमांद्वारे जनजागृती सुरू आहे. मात्र लहान मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी पोलीस खात्याचे बोधचिन्ह असलेले पोस्टर्स शहरात लावण्याचे आवाहन लेखी पत्राद्वारे पोलीस आयुक्तांना केले आहे. जेणेकरून कारवाईच्या भीतीने चिमुरड्यांना तंबाखूजन्य पदार्थांची खरेदी विक्री करण्याचे प्रमाण कमी होईल. शिवाय भायखळ्यात ज्या पानटपरी शालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करत असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.- गीता गवळी, नगरसेविकानियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. तंबाखू आणि गुटखा बंद झालाच पहिजे. मी हा मुद्दा महापालिकेत चर्चेसाठी घेणार आहे. शाळांजवळच्या तंबाखू आणि गुटखा विक्रीचा ‘लोकमत’ने पर्दाफाश करून मोलाचे काम केले आहे. शाळकरी मुले कशाप्रकारे या विळख्यात सापडतात हे सामान्य नागरिकांना कळणे गरजेचे आहे़ यामुळे पालक आपल्या मुलांकडे योग्य लक्ष देतील़ - रूपाली रावराणे, राष्ट्रवादी नगरसेविका, विभाग क्रमांक - ३८गुटखा आणि तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करण्यापेक्षा याचे उत्पादन करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. हे विषारी पदार्थ येणारे स्रोतच आपण बंद केले तर ते विक्रीला येण्याचा आणि लहान मुले त्याला बळी पडण्याचा संबंधच येणार नाही. - एक शिक्षक, टोपीवाला शाळा, मालाड ‘शाळांभोवती मृत्यूचा विळखा’ या स्टिंगमधून लोकमतने सत्य उघडकीस आणले आहे. मात्र परिस्थिती त्याहूनही भयानक आहे. घरातून हे विद्यार्थी पेन, पेन्सिलसाठी पैसे मागतात व त्या पैशाने तंबाखू, सिगारेटसारखे विष विकत घेतात़ बहुतांश वेळा या विद्यार्थ्यांकडे तुम्हाला पेन, पेन्सिल, खोड रबरसारख्या वस्तू नाही सापडणार. मात्र दप्तराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात तंबाखू किवा माव्याची पुडी नक्की सापडेल. मी याबाबत अनेकदा पालकांशी बोललोय. पण पालथ्या घड्यावर पाणी अशी अवस्था झाली आहे. - शाळा प्रशासन, वरिष्ठ अधिकारी शाळेजवळील व्यसनाचा विळखा उठवायला हवादेशाचे भविष्य निर्व्यसनी करायचे असल्यास, शाळा परिसरातील हा व्यसनाचा विळखा उठवायला हवा. तसेच नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे शाळांलगत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असते. यावेळी पानटपरीचालक सिगारेट, तंबाखू, मावा खरेदी करणाऱ्या मुलांच्या वयाकडे कानाडोळा करतात. याला लगाम घालण्यासाठी नव्या कायद्याची गरज नसून, जुन्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. - वर्षा विद्या विलास, सरचिटणीस, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यशहरासह उपनगरांत मोठ्या संख्येने शाळांच्या परिसरात अनधिकृत पानटपऱ्या सुरू आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संघटना कित्येक वर्षांपासून करत आहे. तर अधिकृत पानटपऱ्या चालकांनी लहान मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये, अशी जनजागृती संघटना वेळोवेळी करत असते. मात्र एखाद्या ठिकाणी शाळांच्या आधीपासून पानटपरी सुरू असेल आणि त्यावर प्रशासनाने कारवाईचा प्रयत्न केल्यास संघटना पानटपरीच्या बाजूने उभी राहील.- नंदकुमार हेगिष्टे, कार्याध्यक्ष, मुंबई विडी तंबाखू व्यापारी संघ‘लोकमत’च्या रिअॅलिटीमधून समोर आलेले वास्तव भयावह आहे. यामुळे शासनाने आता तरी तंबाखूजन्य पदार्थांवर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे. तंबाखू उत्पादन-विक्री याद्वारे मिळणाऱ्या महसुलाऐवजी समाजाच्या आरोग्याचा विचार झाला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करून तंबाखूसेवन, धूम्रपान याला आळा घातला पाहिजे.- रोहित पोटफोडे, नोकरीअल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यावर बंदी असूनही डोळेझाकपणे चालणारा कारभार ‘लोकमत’ रिअॅलिटी चेकमधून समोर आला आहे. आता तरी कृतिशील पाऊल उचलून शासनाने तंबाखूवरच बंदी घातली पाहिजे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्र व्यसनमुक्त होण्याकडे वाटचाल होईल.- दीपाली बल्लाळ, नोकरीतंबाखू आणि गुटखा विरोधी अभियानात आम्ही शिक्षक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहभागी आहोत. शंभर फुटांच्या आत अशा प्रकारची दुकाने नसावीत अशी सूचना आमच्याकडे आली आहे. आम्ही स्वत: जाऊन दुकान चालकांना अशा वस्तू विकू नका, असे सांगणार आहोत. त्यांनी न ऐकल्यास संबंधित यंत्रणांकडे याची लेखी तक्रार करण्यात येईल. - महापालिका शाळा क्रमांक - २, एक शिक्षक अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे हे साफ चुकीचे आहे. या तंबाखूविक्रीवर बंदीचा कायदा असूनही अशी खुलेआम विक्री होणे घातक आहे. या पार्श्वभूमीवर, ‘लोकमत’ केलेले रिअॅलिटी चेक शासनाच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. आर.आर. पाटील यांच्या निधनानंतर तरी सरकारने धडा घेऊन या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. - उज्ज्वला सरेकर, गृहिणीतंबाखू आणि तंबाखूजन्य वस्तूंवर शंभर टक्के बंदी आणण्यात यावी. याबाबत सरकारी आदेश निघाल्यानंतरही उघडपणे याची विक्री होते आहे़ माझ्या मते प्रशासनाच्या ज्या अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने हे सुरू आहे त्या अधिकाऱ्यांना मकोका लावला पाहिजे़. - ज्ञानमूर्ती शर्मा, भाजपा नगरसेवक - विभाग क्रमाक ४१‘लोकमत’ने केलेले रिअॅलिटी चेक हे समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. नुकतेच आर.आर. पाटील यांच्या निधनानंतर आरोग्यमंत्र्यांनी तंबाखूजन्य पदार्थांवर निर्बंध घालण्याचे आश्वासन दिले. यापूर्वीही या विषयावर वेगवेगळ्या मंत्र्यांनी घोषणा केल्या आहेत. मात्र घोषणा-आश्वासनांच्या पलीकडे जाऊन या रिअॅलिटी चेकमधून समोर आलेले वास्तव बदलण्याचा प्रयत्न झाला पाहिजे़- संजना अंकुशराव, गृहिणी