Join us  

निवडणूक कामाचा कमी मोबदला देऊन अपमान केल्याचा शिक्षकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2019 2:34 AM

शिक्षक लोकशाही आघाडी : १४०० ऐवजी मिळाले ११५० रुपये

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या कामावरील शिक्षकांना नियमापेक्षा कमी भत्ता देऊन उर्वरित रकमेवर हात मारण्याचे काम सुरू असल्याचा आरोप शिक्षक लोकशाही आघाडीने केला आहे. परीक्षा आणि निकालांच्या कामातही शिक्षकांकडून निवडणुकीचे काम करून घेतले. मतदानाच्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत काम करून त्यांना त्यांचे पूर्ण मानधन देण्यात आले नसल्याचा आरोप शिक्षकांनी केला. हा शिक्षकांचा अपमान असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांमधून उमटत आहेत. या प्रकारामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

मतदानादिवशी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना पहिले, दुसरे प्रशिक्षण, मतदानपूर्व दिवस, मतदानादिवशीचे मानधन आणि भोजन भत्ता देण्यात येतो. मतदान केंदाध्यक्षाला १९०० रुपये, मतदान अधिकाऱ्याला १४०० रुपये देण्यात येत असल्याची माहिती शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पांड्या यांनी दिली. मात्र यातील अर्धीच रक्कम शिक्षकांना मिळाली आहे. शिवाय जेवणाच्या भत्त्याचेही एकाच दिवसाचे पैसे शिक्षकांना वर्ग केल्याचे त्यांनी सांगितले. विशेषत: शिवाजी नगर भागातील मतदान अधिकारी २ आणि मतदान अधिकारी ३ यांना १४०० ऐवजी ११५० एवढाच भत्ता मिळाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. बाकी सगळ्या मतदारसंघातील शिक्षकांना योग्य भत्ता मिळाला तर त्यांना मिळालेल्या भत्त्यात तफावत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हा पैसा नक्की गेला कुठे? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिक्षक लोकशाही आघाडीने केली आहे.

टॅग्स :मतदाननिवडणूकशिक्षक