Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे सुट्टीच्या दिवशी प्रशिक्षण

By admin | Updated: July 3, 2017 07:06 IST

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना जलदगतीने प्रथम भाषा, इंग्रजी, गणित व विज्ञान विषयांचे प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना जलदगतीने प्रथम भाषा, इंग्रजी, गणित व विज्ञान विषयांचे प्रशिक्षण देण्यासाठी, मुंबईत विविध ठिकाणी शनिवार व रविवारी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही शिबिरांचे आयोजन केल्याने, शिक्षक परिषदेने नाराजी व्यक्त केली आहे, शिवाय सुट्टीच्या दिवशी काम केल्याबद्दल शिक्षकांना बदली रजा देण्याची मागणी केली आहे.शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले की, १ व २ जुलै असे दोन दिवस शिक्षण विभागाने नववीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण देण्यास सांगितले होते. मुंबईतील बहुतेक शाळांत पाच दिवसांचा आठवडा असल्याने, शनिवारी व रविवारी शाळांना सुट्टी असते. याउलट सहा दिवस चालणाऱ्या इतर शाळांना रविवारी सुट्टी असते. तरीही सुट्टीच्या दिवशी प्रशिक्षणाचे आयोजन करणे चुकीचे आहे. तरी नियमानुसार शिक्षकांना या प्रशिक्षणाची बदली रजा देण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे. भविष्यात साप्ताहिक किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शिक्षण विभागाने कोणत्याही प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन करू नये, असे आवाहन शिक्षक परिषदेने शिक्षण निरीक्षक व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाच्या प्रकल्प संचालकांकडे केले आहे.