Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकेला डायमंड रिंगसाठी गमवावे लागले ९ लाख ४७ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:24 IST

भावी परदेशी जोड़ीदार निघाला ठग, जे जे मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदशिक्षिकेला डायमंड रिंगसाठी गमवावे लागले ९ लाख...

भावी परदेशी जोड़ीदार निघाला ठग, जे जे मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

शिक्षिकेला डायमंड रिंगसाठी गमवावे लागले ९ लाख

भावी परदेशी जोडीदार निघाला ठग : जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेवर डायमंड रिंग आणि ७० हजार पाउंड्ससाठी ९ लाख ४७ हजार रुपये गमाविण्याची वेळ ओढावली. या प्रकरणी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जे.जे. मार्ग परिसरात राहणाऱ्या ३९ वर्षीय तक्रारदार या खासगी शिकवणी घेतात. २०१४ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. दुसरे लग्न करण्यासाठी सप्टेंबरमध्ये विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली. तेथे ऑक्टोबरमध्ये आजाद इबाहिम हामजा (४३) नावाच्या तरुणाची रिक्वेस्ट आली. तो सिव्हिल इंजिनीअर असल्याचे नमूद करण्यात आले होते. प्रोफाइल आवडल्याने त्यांनी रिक्वेस्ट स्वीकारली. त्याने मोबाइल क्रमांकावरून संपर्क साधला. दोघांमध्ये संवाद वाढला. हामजाने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांनी सुखी संसाराचे स्वप्न रंगविण्यास सुरुवात केली.

अशातच ३१ ऑक्टोबर रोजी हामजाने गिफ्ट पाठवित असल्याचे सांगून पत्ता मागितला. त्यानंतर, एका महिलेने कॉल करून ती दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बोलत असल्याचे सांगितले. तिने यु.के.वरून एक पार्सल आले असून, त्याची इंटरनशनल कस्टम ड्युटी ३५ हजार रुपये असल्याचे सांगितले. शिक्षिकेने याबाबत हामजाकडे चौकशी करताच, त्याने पार्सलमध्ये एक डायमंड रिंग, एका ब्राउन रंगाच्या पाकिटात ७० हजार पाउंड्स पाठविल्याचे सांगितले. त्याची कस्टम ड्युटी भरून ते ताब्यात घेण्याचा सल्ला दिला. त्याच्यावर विश्वास ठेवून शिक्षिकेने पैसे भरले. पुढे याच संदर्भात वेगवगेळ्या कारणांसाठी एकूण ९ लाख ४७ हजार ३०० रुपयांचा फटका तिला बसला. आणखी पैशांची मागणी होताच, संशय आल्याने, तसेच फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिक्षिकेने पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी नुकताच गुन्हा नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे.

...........................................