लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऑनलाइन विक्रीसाठी ठेवलेले जुने कपाट खरेदी करण्याचे आमिष दाखवून संगीत शिकविणाऱ्या शिक्षिकेची फसवणूक केल्याप्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात, ३० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.
दिल्लीच्या रहिवासी असलेल्या २४ वर्षीय तक्रारदार संगीत शिकविण्याचे वर्ग घेतात. त्यांनी ऑगस्ट महिन्यात एका ॲपवर घरातील लाकडी जुने कपाट ५० हजार रुपयांना विक्रीसाठी ठेवले. २३ ऑगस्टला त्यांना विकास कुमार नावाच्या व्यक्तीने कॉल करून ४७ हजार रुपयांत ते खरेदी करण्याची तयारी दर्शविली. त्यांनी होकार देताच, पुढे क्यूआर कोड पाठवत तो गूगल पे या ॲपवर स्कॅन करण्यास सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून शिक्षक तरुणीने गूगल पेवर तो कोड स्कॅन करताच खात्यात पैसे येण्याऐवजी खात्यातून १५ हजार रुपये वजा झाले. त्यानंतर विकास कुमार याने चुकून पैसे डेबिट झाल्याचे सांगत ही रक्कम परत पाठविण्याचा बहाणा करून आणखी एक क्यूआर कोड त्यांना पाठविला. ३० हजार रिफंड मनी लिहिलेला हा क्यूआर कोड स्कॅन करताच त्यांच्या खात्यातून आणखी ३० हजार रुपये वजा झाले. यात फसवणूक झाल्याने त्यांनी अंधेरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.