Join us

चहा, नाश्ता अन् लगबग

By admin | Updated: October 16, 2014 01:22 IST

कार्यकर्त्यांची लगबग, चहा, नाश्ता आणि राजकीय घडामोडींबाबत रंगलेली चर्चा असेच काहीसे चित्र मुंबईतील सगळ्याच विधानसभा मतदारसंघांत होते

मुंबई : कार्यकर्त्यांची लगबग, चहा, नाश्ता आणि राजकीय घडामोडींबाबत रंगलेली चर्चा असेच काहीसे चित्र मुंबईतील सगळ्याच विधानसभा मतदारसंघांत होते. मतदार यादीत नाव आहे की नाही, हे सहजरीत्या मतदारांना कळावे यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना मतदार याद्यांसह स्वतंत्र टेबल राजकीय पक्षांकडून देण्यात आले. त्या वेळी कार्यकर्त्यांचीही मने जपण्याचे काम प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराकडून केले जात होते. बुधवारी सकाळी तर सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात होणार असल्याने एक तास आधीच वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या मतदारसंघात मतदार याद्यांसह स्वतंत्र टेबल मांडण्यात आले. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कार्यकर्त्यांना मतदार याद्या घेऊन बसावे लागणार असल्याने कार्यकर्त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी उमेदवारांकडून कार्यकर्त्यांची नाश्तासह जेवणाची चांगलीच सोय करण्यात आली. यासाठी काही महिला बचत गटांनाही आॅर्डर देण्यात आल्या होत्या. कांदेपोहे, वडापाव, शिरा आणि चहा या नाश्तासह दुपारसाठी पावभाजी, व्हेज पुलाव, व्हेज बिर्याणी तसेच चायनीज पदार्थांची रेलचेल कार्यकर्त्यांसाठी होती. त्यामुळे कार्यकर्त्यांकडूनही या पदार्थांवर ताव मारला जात होता. प्रत्येक विधनासभा मतदारसंघातील एका वॉर्डमध्ये जवळपास आठ ते दहा टेबल राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे होते. (प्रतिनिधी)