Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील रेल्वे स्थानकांत मिळतोय कुल्हडमध्ये चहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:24 IST

मुंबई : रेल्वे स्थानकावर यापुढे पेपर कपाऐवजी ''कुल्हड’मधून चहा द्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत, पण मुंबईत अद्यापही अनेक ...

मुंबई : रेल्वे स्थानकावर यापुढे पेपर कपाऐवजी ''कुल्हड’मधून चहा द्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत, पण मुंबईत अद्यापही अनेक रेल्वे स्थानकांवर पेपर कपमध्येच चहा मिळत होता. मध्य रेल्वेने मुंबई विभागात कुल्हड (मातीच्या कप)मध्ये चहाची विक्री सुरू केली असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

''कुल्हड''चा वापर हा केवळ पर्यावरणाकडे जाणारा एक पाऊलच नाही, तर यामुळे कुंभारांच्या उद्योगाला चालना मिळेल आणि उत्पादकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होईल.

मध्य रेल्वेने मुंबईसह नागपूर, भुसावळ, सोलापूर, पुणे विभागातील कुल्हड (मातीच्या कप)मध्ये चहाची विक्री सुरू केली असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, पनवेल, इगतपुरी, कर्जत आणि लोणावळा या स्थानकांवर सध्या कुल्हडमध्ये चहा उपलब्ध आहे. प्रवाशी सुनील जॉन म्हणाले की, ‘कुल्हड’मध्ये चहा घेण्याचा अनुभव खरोखरच वेगळा आहे, तर प्रवासी इशाक यांनी सांगितले की, कुल्हडमध्ये चहा पिणे हा एक वेगळाच अनुभव आहे. कुल्हडमधील चहा मधुर लागतो, याबद्दल रेल्वेमंत्र्यांचे आभार मानतो.

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी देशातील सर्व रेल्वे स्थानके प्लास्टीकमुक्त करण्यासाठी ‘कुल्हड’मधून चहा देण्याचा निर्णय घेतला. कुल्हड म्हणजे मातीचे बोळके (कप) होय. २००४ ते २००९ दरम्यान यूपीएच्या काळात लालू प्रसाद यादव केंद्रीय रेल्वेमंत्री होते, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा रेल्वे स्टेशनवर कुल्हडमधून चहा देण्याची अंमलबजावणी केली होती. मात्र, त्यांचे मंत्रिपद जाताच हा उपक्रम बंद पडला. पुन्हा पेपर कपातून चहा देण्यात येऊ लागला.