Join us
Daily Top 2Weekly Top 5

टॅक्सी चालकांचा पोशाख बदलणार

By admin | Updated: May 11, 2015 04:08 IST

खाकी पोशाखात असलेला टॅक्सी चालक आता लवकरच शाही रंग मानल्या जाणाऱ्या सफेद पोशाखात दिसणार आहे.

मुंबई : खाकी पोशाखात असलेला टॅक्सी चालक आता लवकरच शाही रंग मानल्या जाणाऱ्या सफेद पोशाखात दिसणार आहे. शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार चालकांचा पोशाख सफेद करण्याचा निर्णय टॅक्सी संघटनांकडून घेण्यात आला आहे. २00३ साली एक परिपत्रक काढून चालकांचा पोषाख खाकी रंगाचाच असावा अशा सूचना शासनाकडून करण्यात आल्या. मात्र या रंगाचा पोशाख नको असे सांगत त्याला टॅक्सी संघटनांकडून विरोध दर्शविण्यात आला. दुसरा सफेद रंगही पर्याय देण्याची मागणी संघटनांकडून करण्यात आली. मात्र ती अमान्य करण्यात आली. त्यानंतर २00७ साली पुन्हा एकदा परिपत्रक काढून पोशाखाचा हाच रंग ठेवण्याच्या सूचना करण्यात आली. मात्र चालकाला सफेद रंगाचा पोशाख हा उत्तम वाटत असून, खाकी पोशाख बदलण्याची मागणी तेव्हाही करण्यात आली. मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. २0१३ साली शासनाने टॅक्सी संघटनांची मागणी विचारात घेऊन सफेद रंगाचा पोशाख टॅक्सी चालकांसाठी कायमस्वरूपी करण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र त्याचे परिपत्रक काढण्यात आले नव्हते. अखेर एप्रिल २0१४मध्ये चालकांसाठी सफेद रंगाचा पोेशाख करण्यात येत असल्याचे परिपत्रक काढून त्यावर काही आक्षेप असल्यास ते नोंदविण्यास सांगितले; आणि त्यासाठी ४ मेपर्यंतची मुदत देण्यात आली. आता ४ मेची मुदत संपल्याने आणि कुणीही आक्षेप न घेतल्याने अखेर सफेद रंगाच्या पोशाखाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे महासचिव ए.एल. क्वाड्रोस यांनी सांगितले. सफेद रंगाचा पोशाख हा शाही पोशाख वाटतो. त्यामुळेच ही मागणी केली जात होती. आता मागणी मान्य झाली असून, चालकांना त्याची माहिती देण्यात येईल, असे क्वाड्रोस म्हणाले.> ब-याच वर्षांपूर्वी टॅक्सी चालक सफेद रंगाचा पोशाख वापरत असे. मात्र त्यानंतर शासनाकडून वेळोवेळी त्यात बदल केले गेले आणि कायमस्वरूपी असा खाकी पोशाखच ठेवण्यात आला होता. मात्र शाही रंग असलेल्या सफेद रंगाच्या पोशाखाची मागणी टॅक्सी संघटनांकडून होत होती.