मुंबई : टॅक्सी चालक-मालक यांच्या मागण्यांबाबत सरकार चालढकल करत असल्याचा आरोप करत, जय भगवान महासंघ या टॅक्सी चालकांच्या संघटनेने बुधवारी आक्रमक पवित्रा घेतला. मुख्यमंत्र्यांनी १0 दिवसांत ठोस निर्णय घेतला नाही, तर रस्त्यावर उतरून बेमुदत बंद पुकारण्याची घोषणा संघटनेने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.या वेळी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सानप म्हणाले की, ओला आणि उबर या कंपन्यांमध्ये काळी-पिवळी टॅक्सी विलीन होत असल्याची खोटी माहिती चालक व मालकांना देण्यात येत आहे. मुळात खासगी कंपन्यांना लगाम लावण्याच्या मागण्यासाठी संघटनेने दोन वेळा बेमुदत आंदोलन पुकारले होते. मात्र, एकदा परिवहनमंत्री आणि दुसर्यांदा मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, हा त्यामागील आणखी एक हेतू होता. मात्र, सरकार टॅक्सी चालक-मालकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने, या वेळी बेमुदत आंदोलन मागे घेणार नसल्याचेही सानप यांनी स्पष्ट केले.दरम्यान, दोन महिन्यांत सुमारे ३२ हजार टॅक्सी चालक-मालकांनी संघटनेला पाठिंबा दिल्याचे सानप यांनी सांगितले. सर्व चालक व मालकांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच टॅक्सी चालकांसाठी खासगी कंपनीप्रमाणे एक अँप लाँच करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, या अँपबाबत येत्या १0 दिवसांत ठोस निर्णयाची घोषणा केली नाही, तर आंदोलन अटळ असेल, असा इशाराही सानप यांनी दिला आहे
टॅक्सी चालक-मालक बंदच्या पवित्र्यात
By admin | Updated: November 10, 2016 06:39 IST