Join us  

मुंबईतील ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी; ३० लाख ग्राहकांना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 4:19 AM

मुंबईतल्या ५०० फुटांच्या औद्योगिक, व्यापारी आणि निवासी गाळ्यांचा मालमत्ता कर माफ करण्याचे विधेयक आज विधान परिषदेत एकमताने मंजूर झाले.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या हद्दीतल्या ५०० चौरस फुटांचे चटई क्षेत्र असलेली घरे आणि सर्व प्रकारच्या गाळ्यांचा मालमत्ता करमाफ करण्यात येत आहे. तसेच इतर सक्षम महापालिकेकडून तसा प्रस्ताव आल्यास राज्य सरकार त्याचा सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.मुंबईतल्या ५०० फुटांच्या औद्योगिक, व्यापारी आणि निवासी गाळ्यांचा मालमत्ता कर माफ करण्याचे विधेयक आज विधान परिषदेत एकमताने मंजूर झाले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, या निर्णयामुळे ३० लाख धारकांना लाभ होणार आहे.ज्या धारकांना याचा लाभ होणार आहे त्यातले १८ लाख धारक निवासी गाळे वापरत असल्याचे समोर आले आहे. एकूण निवासी गाळेधारकांपैकी ही संख्या ७५ टक्के असल्याचे उघड झाले आहे.मुंबई महापालिका असा कर माफ करायला सक्षम आहे. तशी आर्थिक कुवत एखाद्या महापालिकेकडे असेल आणि त्यांनी तसा निर्णय घेतल्यास सरकार त्याचा विचार करेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मालमत्ता कर माफ झाला असला तरी इतर सेवांसाठी असलेले कर घेतलेच जाणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. अनिल परब, शरद रणपिसे, किरण पावसकर, विद्या चव्हाण, हेमंत टकले, राहुल नार्वेकर, प्रकाश गजभिये आदींनी यावरील चर्चेत भाग घेतला.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमुंबई