मुंबई : मुंबई महानगरासाठी ७ हजार ८४३ टॅक्सी परवान्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज आॅनलाइन लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. आज सायंकाळी विधानभवनात आॅनलाइन लॉटरीद्वारे परवाने वाटपाचा कार्यक्रम पार पडला. परिवहन विभागातील टॅक्सी परवान्यांचे वाटप आॅनलाइन लॉटरी पद्धतीने झाल्यामुळे या प्रक्रियेत पूर्णत: पारदर्शकता आली आहे. आता प्रत्यक्ष परवाने वाटप करताना संबंधित अर्जदाराची कागदपत्रे, चारित्र्य आदींची पुन्हा पडताळणी करण्यात यावी, जेणेकरून मुंबईकरांना सुयोग्य टॅक्सी परवानाधारक, मालक तसेच चालकांकडून चांगली, सुरक्षित आणि विश्वासार्ह परिवहन सुविधा मिळू शकेल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. मुंबई महानगर क्षेत्रात नूतनीकरण न झालेले, रद्द झालेले एकूण १९ हजार ६८७ टॅक्सी परवाने होते. यापैकी फोन फ्लीट टॅक्सी योजनेसाठी ४ हजार परवाने लिलाव पद्धतीने वितरित करण्यात आले. उर्वरित १५ हजार ६८७ परवान्यांपैकी ५० टक्के म्हणजे ७ हजार ८४३ परवान्यांची आज आॅनलाइन लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. यासाठी पात्र इच्छुकांकडून आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. २७ हजार ८७ अर्जदार आॅनलाइन लॉटरीसाठी पात्र ठरले होते. (प्रतिनिधी)