Join us

टाटा पॉवर वीज दरवाढ करणार नाही; भाजपा आ. मनीषा चौधरी यांच्या मागणीला यश

By मनोहर कुंभेजकर | Updated: January 31, 2024 17:17 IST

भाजपा नेहमीच सर्वसामान्यांच्या बाजूने उभा राहून काम करते. सर्वसामान्य मुंबईकरांवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ अशी प्रतिक्रिया आमदार मनीषा चौधरी यांनी दिली.

मनोहर कुंभेजकर, मुंबई: टाटा पॉवर कंपनीकडून मोठ्या वीजदरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगासमोर ठेवला आहे. सर्वसामान्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार असल्याने दहिसरच्या भाजपा आमदार मनीषा चौधरी यांनी टाटा पॉवर कंपनीच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून वीज दरवाढ करू नये अशी मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत टाटा पॉवर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज दरवाढ करणार नाही अशी हमी दिली. टाटा पॉवर तर्फे मुंबईत साडेसात लाख ग्राहकांना वीज दिली जाते.

कमी वीज वापरणाऱ्यांसाठी दुपटीपेक्षा जास्त वीज दरवाढ तर जास्त वीज वापरणाऱ्यांसाठी फक्त दोन ते दहा टक्के दरवाढ असा मोठ्या वीजदरवाढीचा प्रस्ताव टाटा पॉवरने राज्य वीज नियामक आयोगासमोर ठेवला आहे. त्यामुळे कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना आता दुप्पट वीजबिल आले असते. टाटा पॉवरच्या या प्रस्तावानुसार १०० युनिट वीज वापरणाऱ्यांना सध्याच्या प्रति युनिट तीन रुपये ३४ पैशांऐवजी सात रुपये ३७ पैसे द्यावे लागतील. ही वाढ दुपटीहून जास्त म्हणजे १२१ टक्के आहे. तर १०१ ते ३०० युनिट वापरणाऱ्यांना सध्याच्या ५ रुपये ८९ पैसे या दराऐवजी ९ रुपये ३१ पैसे प्रति युनिट द्यावे लागतील. ही वाढ ५८ टक्के आहे. दुसरीकडे ३०१ ते ५०० युनिट वापरणाऱ्यांना प्रत्येक युनिटमागे सध्याच्या नऊ रुपये ३४ पैशांऐवजी १० रुपये २१ पैसे द्यावे लागतील. ही वाढ फक्त ९.३ टक्के आहे. तर ५०० पेक्षा जास्त युनिट वापरणाऱ्यांना प्रत्येक युनिटमागे दहा रुपये चार पैसे ऐवजी दहा रुपये २८ पैसे द्यावे लागतील. ही वाढ फक्त दोन टक्के आहे. अशाप्रकारे कमी वीज वापरणाऱ्यांसाठी जास्त दरवाढ, तर जास्त वीज वापरणाऱ्यांसाठी कमी दरवाढ, असा प्रस्ताव टाटाने दिला आहे.

भाजपा नेहमीच सर्वसामान्यांच्या बाजूने उभा राहून काम करते. सर्वसामान्य मुंबईकरांवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ अशी प्रतिक्रिया आमदार मनीषा चौधरी यांनी दिली.

टॅग्स :वीज