Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्णब गोस्वामींचा टाइम्स नाऊला टाटा

By admin | Updated: November 1, 2016 20:54 IST

टाइम्स नाऊचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी टाइम्स नाऊचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 11 - टाइम्स नाऊचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी टाइम्स नाऊचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. आज झालेल्या संपादकीय बैठकीत त्यांनी आपला निर्णय कळवल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया सर्कलमध्ये लगेचच या वृत्ताची चर्चा सुरू झाली असून टाइम्स नाऊमधल्या काही जणांनी या वृत्ताला  दुजोरा दिला आहे.

अर्णब गोस्वामी या नंतर सध्या अस्तित्वात असलेल्या वाहिन्यांपैकी कुठल्या वाहिनीत जातात अथवा नवीन वाहिनी सुरू करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अर्णब गेली 10 वर्षे टाइम्स नाऊमध्ये असून आता नंतर ते काय करणार आहेत याबद्दल माहिती उपलब्ध नाही. मात्र, ते स्वत:चा चॅनेल काढतिल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गोस्वामी यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप टाइम्स नाऊने अधिकृतरीत्या काही जाहीर केले नसून त्यांची जागा कोण घेणार हे ही गुलदस्त्यात आहे.
मूळचे आसाममधील लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा असलेले अर्णब शिक्षणानिमित्त विविध शहरांमध्ये राहिले आहेत. दिल्ली, जबलपूरसह ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतले. कोलकात्यातील टेलिग्राफमध्ये पत्रकारिता सुरू करणाऱ्या अर्णब यांनी नंतर एनडीटिव्हीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर एडिटर इन चीफच्या भूमिकेत ते 2006 मध्ये सुरू झालेल्या टाइम्स नाऊमध्ये रूज झाले. सोमवार ते शुक्रवार टाइम्स नाऊवर रात्री 9 वाजता चालणारा न्यूज अवर हा त्यांचा शो चांगलाच गाजलेला आहे.
 
दरम्यान, अर्णब गोस्वामी यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त सोशल मिडीयात झळकल्यानंतर नेटिझन्सनी ट्विटरच्यामाध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या. तसेच, ट्‌विटरवर आज  #ArnabGoswami हा ट्रेंड दिसून येत आहे.