मुंबई : अनधिकृत रिक्षा चालकांकडून मुंबईकरांची होणारी लूट आणि अधिकृत रिक्षा चालकांचे बुडणारे उत्पन्न पाहता या रिक्षांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय परिवहन आयुक्त कार्यालयाने घेतला आहे. त्यासाठी ३ नोव्हेंबरपासून विशेष मोहीम घेतली जाणार असल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. कालबाह्य आणि बोगस रिक्षांविरोधातही कारवाई करण्यात येणार असून, त्या जप्त केल्यानंतर त्या जेसीबीद्वारे मोडीत काढण्यात येणार आहेत. मुंबई उपनगरात जवळपास एक लाख अधिकृत रिक्षा आणि अनेक कालबाह्य झालेल्या व अनधिकृत रिक्षाही धावत आहेत. या रिक्षांकडून भाडे आकारणी जास्त होण्याबरोबरच कालबाह्य रिक्षांमुळे प्रवाशांच्या जिवालाही धोका संभवतो. या रिक्षांमुळे अधिकृत रिक्षाचालकांचे उत्पन्न बुडत असल्याचे सांगत त्याविरोधात आरटीओकडून कारवाई केली जात नसल्याचा आरोप रिक्षा युनियनकडून केला जात आहे. ही परिस्थिती पाहता अनधिकृत, बोगस आणि कालबाह्य रिक्षांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय परिवहन आयुक्त कार्यालयाने घेतला आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांचीही मदत घेण्यात येणार आहे. यासंदर्भात सोमवारी परिवहन आयुक्त सोनिया सेठी, आरटीओ अधिकारी आणि मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत रिक्षा तपासणीची मुंबईत विशेष मोहीम घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अंधेरी, बोरीवली आणि वडाळा आरटीओंतर्गत ही मोहीम हाती घेण्यात येईल. कागदपत्रे नसलेल्या आणि कालबाह्य तसेच बोगस रिक्षांवर कारवाई करताना त्या जप्त केल्या जातील. त्यानंतर त्या गॅस कटरने तोडण्याऐवजी जेसीबीमार्फत पूर्णपणे तोडण्यात येणार असल्याची माहिती अपर परिवहन आयुक्त सतीश सहस्रबुद्धे यांनी दिली. ही मोहीम १५ दिवस चालणार आहे.
मुंबईत ‘अनधिकृत’ रिक्षा होणार टार्गेट
By admin | Updated: November 3, 2015 03:15 IST