Join us  

तारापूरला होणार 30 लाख रेमडेसिविर इंजेक्शन्सचे उत्पादन!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 5:21 AM

मागणी वाढली : जिल्ह्यासह राज्याला होणार लाभ

पंकज राऊत

बोईसर : कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना जीवनदायी समजल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शन्सचा तुटवडा जाणवत असल्याने चिंता व्यक्त आहे. मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमुळे वेळेवर पुरेसे इंजेक्शन्स उपलब्ध होत नसल्याने कोरोना रुग्ण अत्यवस्थ होत आहेत, तर इंजेक्शन मिळविण्याकरिता रुग्णांच्या नातेवाइकांची जीवघेणी धावपळ सुरू आहे. दरम्यान, बुधवारपासून (दि.५) तारापूरला दरमहा ३० लाख रेमडेसिविर इंजेक्शन्सचे उत्पादन सुरू होणार आहे, यामुळे दिलासा मिळाला आहे.

तारापूर एमआयडीसीमध्ये कमला लाइफ सायन्स लि. या कारखान्यात विविध प्रकारची औषधे आणि औषधांकरिता लागणारा कच्चा माल मागील अनेक वर्षांपासून तयार करण्यात येत आहे. देशात कोरोनाची मागील वर्षी पहिली लाट आली तेव्हा सिप्ला या नामवंत औषध कंपनीने तारापूरच्या कमला लाइफ सायन्स या कारखान्यातून ऑगस्ट २०२० पासून जॉब वर्कच्या माध्यमातून रेमडेसिविर इंजेक्शन तयार करण्यास सुरुवात केली. प्रथम प्रतिदिन १०, नंतर २० हजार तर आता सुमारे एक लाख इंजेक्शन्सचे उत्पादन या कारखान्यात काढले जाणार आहे. इंजेक्शनसाठी सर्वत्र मागणी वाढल्यामुळे राष्ट्रहितासाठी जलद गतीने या इंजेक्शनचे उत्पादन होणे गरजेचे आहे. यामुळे कारखान्याचे मालक डॉ. दिगंबर झवर यांनी इंजेक्शनची गरज लक्षात घेऊन कारखान्यामध्ये अद्ययावत यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला. आता सुमारे ५० लाखांपर्यंत इंजेक्शन्स तयार करण्याची क्षमता वाढवण्यात आली असून, पुरेसा कच्चा माल उपलब्ध झाला तर पूर्ण क्षमतेने रेमडेसिविरचे उत्पादन घेऊ शकतो, असा विश्वास डॉ. झवर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

तुटवडा जाणवणार नाही nसिप्लाच्या व्यवस्थापनाला विशेष विनंती करून काही कोटा मागविण्यात येणार असून, ते मान्य झाल्यास पालघर जिल्ह्यात पुढील आठवड्यापासून अजिबात तुटवडा जाणवणार नाही. nतारापूरला रेमडेसिविर इंजेक्शनचे फिनिश प्रॉडक्ट तयार केले जाते. याकरिता कच्चा माल (केमिकल), इंजेक्शन बाटल्या, पॅकिंग मटेरियल व लेबल इत्यादी सर्व सिप्ला कंपनीकडून पुरविले जाते.

टॅग्स :रेमडेसिवीरकोरोना वायरस बातम्या