Join us  

अॅलर्ट ! मोबाइल फोन चार्जिंगला लावून बोलताना शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 11:59 AM

मोबाईल फोन चार्जिंगला लावला असताना बोलू नये अशी सूचना अनेकदा केली जाते

ठळक मुद्देमोबाइल फोन चार्जिंगला लावून बोलताना शॉक लागल्याने तप्पन गोस्वामी या तरुणाचा मृत्यू28 वर्षीय तप्पन गोस्वामी मूळचा पश्चिम बंगालचा होतापोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे

मुंबई, दि. 24 - मोबाइल फोन चार्जिंगला लावून बोलताना शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना वांद्रे येथे घडली आहे. या घटनेमुळे मोबाइल फोन चार्जिंगला लावला असताना त्याचा वापर करणं धोक्याचं ठरु शकतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. तप्पन गोस्वामी असं या तरुणाचं नाव आहे. वांद्रे येथील एका बुटिकमध्ये तो काम करत होता. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. मोबाईल फोन चार्जिंगला लावून त्याचा वापर केल्याने त्याला शॉक बसला, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. 

28 वर्षीय तप्पन गोस्वामी मूळचा पश्चिम बंगालचा होता. काही दिवसांपुर्वीच नोकरी करण्यासाठी तो मुंबईत आला होता. वांद्रे येथील शास्त्रीनगरमध्ये आपल्या दोन मित्रांसोबत एका फ्लॅटमध्ये तो राहत होता.

स्थानिक रहिवाशाने दिलेल्या माहितीनुसार, 'मंगळवारी संध्याकाळी त्याचा मित्र संजय घरी आला होता. यावेळी तप्पन जमिनीवर बेशुद्द असस्थेत पडला असल्याचं त्याला दिसलं. त्याच्या बाजूला मोबाइल पडला होता. संजयने आरडाओरड सुरु केल्यानंतर शेजारी धावत गेले. त्याला तात्काळ भाभा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे पोहोचण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता'. विजेचा झटका लागल्याने तप्पनचा मृत्यू झाल्याची माहिती भाभा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर प्रदीप जाधव यांनी दिली आहे.  

 'मला वाटतं पावसाचं पाणी स्विचबोर्डमध्ये गेलं असावं. याची कल्पना किंवा माहिती नसलेल्या तप्पनने आपला फोन तिथे चार्जिंगला लावला असावा. यामुळे नंतर त्याने फोनला हात लावला असता विजेचा झटका लागला असेल', अशी शक्यता शेजारी खुर्शिद शेख यांनी वर्तवली आहे. 

'तपास केला असता त्याचा मृत्यू फोनवर बोलताना विजेचा झटका लागून झाल्याचं निष्पन्न झालं आहे', अशी माहिती वांद्र पोलीस स्थानकातील अधिका-याने दिली आहे. 'आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपासासाठी पोस्ट मॉर्टम रिपोर्ट येण्याची वाट पाहत आहोत', असंही अधिका-याने सांगितलं आहे. 

मोबाइल फोन चार्जिंगला लावला असताना बोलू नये अशी सूचना अनेकदा केली जाते. मात्र त्याने काय होणार आहे असं म्हणत अनेकदा त्याकडे सहजपणे दुर्लक्ष केलं जातं. या घटनेमुळे हे आपल्या जीवावर बेतू शकतं हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे तुम्ही अशाप्रकारे मोबाइल वापरत असाल तर धोक्याचं ठरु शकतं.

मोबाइल बॅटरी वापरताना ही काळजी घ्या- - मोबाइल बॅटरी मर्यादेपलीकडे चार्ज (ओव्हरचार्ज) करू नये. कोणतीही रीचार्जेबल बॅटरी मर्यादेपलीकडे चार्ज केली असता (ओव्हरचार्ज) खराब होते. तसेच त्याचे आयुष्य कमी होते. ओव्हर चार्ज होत असताना बॅटरी फुटू शकते.- मोबाइलची बॅटरी खिशात किंवा पर्समध्ये ठेवू नका. कारण त्याच्या टर्मिनलचा धातूच्या नाण्यांशी संपर्क आल्यास बॅटरी शॉर्टसर्किट होऊन डिस्चार्ज होऊ शकते किंवा गरम होऊन फुटू शकते.- मोबाइल फोनवर चार्जिंग लावून कोणाशी बोलू नका, त्यामुळे मोबाइल फोनची बॅटरी फुटू शकते.

टॅग्स :तंत्रज्ञानमोबाइल