Join us  

जी लस उपलब्ध असेल तीच घ्या, पर्याय नकाे! महापालिका आयुक्तांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 9:51 AM

मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून ‘कोविड - १९’ लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या कंपनीची कोविशिल्ड लस उपलब्ध करून देण्यात आली.

मुंबई : लसीकरण सुरू झाल्यानंतर मुंबईत कोविशिल्ड लस देण्यास महापालिकेने सुरुवात केली. मात्र, सोमवारपासून भारत बायोटेक कंपनी निर्मित कोव्हॅक्सिन ही दुसरी लस उपलब्ध करण्यात आली आहे. ही लस अधिक प्रभावी असल्याचा समज करून लोकांकडून हीच लस देण्याचा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर आपल्याला लस निवडण्याचा पर्याय उपलब्ध नाही. दोन्ही लसींबाबत संभ्रम न बाळगता लसीकरण केंद्रावर जी लस उपलब्ध असेल त्याचा लाभ घ्या, असे आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केले आहे.मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून ‘कोविड - १९’ लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या कंपनीची कोविशिल्ड लस उपलब्ध करून देण्यात आली. तर १५ मार्चपासून ‘भारत बायोटेक’ या कंपनीची कोव्हॅक्सिन ही लस वापरण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. याव्यतिरिक्त इतर काही वेगळ्या लसीदेखील भविष्यात उपलब्ध होणार आहेत. मात्र, नवीन लस बाजारात आल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम वाढले आहे. अनेक ठिकाणी केंद्रावर नागरिक कोविशिल्डची मागणी करीत असल्याने लस देण्यास विलंब होत आहे.सध्या दोन्ही प्रकारच्या लस मुंबईसह देशात वापरण्यात येत असून दोन्ही लसी परिणामकारक आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रावर दोन्ही लसींबाबत संभ्रम न बाळगता लसीकरण केंद्रावर जी लस उपलब्ध असेल ती घ्या, असे आवाहन आयुक्तांनी शुक्रवारी केले. तसेच लस घेतल्यानंतरही सर्वच नागरिकांनी कोविड प्रतिबंधासाठी संबंधित नियमांचे पालन करावे. सॅनिटायझरचा वापर करणे किंवा हात धुणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. 

विलगीकरण आवश्यककोविड- १९ या संसर्गजन्य आजारावर खात्रीशीर औषध नसल्यामुळे कोरोना झालेल्या व्यक्ती किंवा त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्ती यांचे विलगीकरण, अलगीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे नियमांचे काटेकोरपणे पालन करा, अशी सूचना पालिकेने केली आहे. 

टॅग्स :कोरोनाची लसकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस