Join us

‘त्यांच्या’ कार्याचा घेणार फेरआढावा

By admin | Updated: August 4, 2015 01:33 IST

कर्तव्य बजावत असताना जाणीवपूर्वक अथवा नकळतपणे नियम व शिस्तीचा भंग केल्यामुळे वादग्रस्त बनलेल्या राज्य पोलीस दलातील

जमीर काझी, मुंबईकर्तव्य बजावत असताना जाणीवपूर्वक अथवा नकळतपणे नियम व शिस्तीचा भंग केल्यामुळे वादग्रस्त बनलेल्या राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. विविध गुन्हे किंवा खातेनिहाय कारवाई झालेल्या १८२ पोलीस उपनिरीक्षकांकडून झालेल्या नियमबाह्य कृत्याबाबतचा पोलीस महासंचालकांकडून फेरआढावा घेतला जाणार आहे. त्यामध्ये पात्र ठरणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवाज्येष्ठतेच्या आधारावर पदोन्नती देण्यात येणार आहे. राज्यभरातील विविध आयुक्तालये व अधीक्षक कार्यालयोच्या कार्यक्षेत्रात हे अधिकारी कार्यरत आहेत किंवा ज्या ठिकाणाहून निलंबित झालेले आहेत, त्यांच्या संबंधित घटक प्रमुखाकडून विभागीय चौकशी, गोपनीय अहवाल (सीआर) व सेवा तपशिलाची माहिती तातडीने मागविण्यात आली आहे. बुधवारपर्यंत त्यांच्याबाबतचे अहवाल पोलीस मुख्यालयात सादर करावयाचे आहेत. पोलीस महासंचालक संजीय दयाळ येत्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत़ त्यामुळे पोलीस मुख्यालयातील विविध विभागांतील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा केला जात आहे. त्यानुसार सेवाज्येष्ठतेच्या आधारावर पदोन्नतीसाठी पात्र ठरत आहेत. मात्र त्यांच्यावर ड्युटीवर असताना विविध गुन्हे अथवा शिस्तीभंगाची कारवाई झालेली आहे, अशा १८२ उपनिरीक्षकांची यादी बनविण्यात आलेली आहे. यामध्ये अनेकांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) कारवाई झालेली असून ते निलंबन कालावधी पूर्ण करून पुन्हा सेवेत रुजू झालेले आहेत़ त्याचप्रमाणे कर्तव्य बजावत असताना पदाचा गैरवापर करून गैरकृत्य केल्याबाबत गुन्हे दाखल झाले होते, त्यांची संबंधित घटकातील प्रमुखांकडून विभागीय चौकशी झाल्याने किंवा त्याबाबत ‘मॅट’मधून आदेश झाल्याने पुन्हा सेवेत घेण्यात आलेले आहे. मात्र त्यांच्या खातेनिहाय चौकशीचा अहवाल अद्याप प्रलंबित राहिल्याने वेतनवाढ, पदोन्नती रोखण्यात आलेली आहे. या १८२ उपनिरीक्षकांपैकी अनेक अधिकारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्धची चौकशी पूर्ण होऊन निर्दोष ठरले असल्यास किंवा त्यांना देण्यात आलेल्या शिक्षेचा, समज देण्याबाबतचा कालावधी पूर्ण झाला असल्यास आणि पदोन्नतीसाठी पात्र ठरत असल्यास सेवाज्येष्ठतेच्या आधारावर साहाय्यक निरीक्षक म्हणून बढती दिली जाणार आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.