मुंबई : वडाळा येथील प्रतिपंढरपूर तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त सोमवारी भाविकांच्या टाळ-मृदुंगाच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. याचप्रमाणे अवघ्या मुंबापुरीत ठिकठिकाणी वारकऱ्यांनी एकत्र येत माउलीच्या नामाचा गजर केला.या मंदिरात शिवडी, काळाचौकी, लालबाग, परळ, ना.म. जोशी मार्ग, कॉटनग्रीन या ठिकाणांहून अनेक वारकऱ्यांनी मृदुंगाच्या तालावर ताल धरत आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनाकरिता एकच गर्दी केली होती. विठ्ठलनामाचा जप करत भाविकांच्या अनेक दिंड्या रात्रीपासूनच मंदिराकडे निघाल्या होत्या. यामुळे संपूर्ण परिसर हा भक्तीमय झाला होता. वारीच्या अनेक पथकांत महिलावर्गानेही मोठ्या संख्येने सहभागी होत फुगड्यांचा डाव धरला, तर पुरुषांनी रिंगण करीत दिंडीची शोभा वाढविली. यंदाच्या पथकात लहान शाळकरी मुले पारंपरिक वेशात मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने ते यंदाचे मोठे आकर्षण ठरले. भक्तांची गर्दी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. व्यसनमुक्तीचे साकडेआषाढी एकादशीनिमित्त वडाळा मंदिर परिसरात व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. या वेळी पोस्टर्स प्रदर्शन, व्यसनमुक्तीच्या प्रचार पत्रकांचे वाटप व व्यसनमुक्तीवरील प्रबोधन गीते इ. मेगाफोनच्या माध्यमातून जनजागृतीपर संदेश देण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्राला व्यसनांनी विळखा घातला असून या व्यसनांपासून परावृत्त व्हावे व जनतेने निर्व्यसनी राहून आनंदी जीवन जगावे, यासाठी विठ्ठल-रखुमाईला महाराष्ट्राला व्यसनमुक्त करण्याचे साकडे नशाबंदी मंडळातर्फे घालण्यात आले. (प्रतिनिधी)चिमुरड्यांची दिंडीपवईतील विद्यानिकेतन शिक्षण संस्थेची ज्ञानमंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातही आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांमधूनच ‘विठ्ठल-रुक्मिणी’ तयार करून वारकरी यांच्यासोबत संपूर्ण पवईभर दिंडी यात्रा काढण्यात आली. यानिमित्ताने शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रमही पार पडला. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि मुख्याध्यापकांनीही आवर्जून हजेरी लावली.भजन मंडळांचाही पुढाकारदहिसर येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरातही आषाढी एकादशी साजरी करण्यात वारकऱ्यांसह रेल्वेमधील भजनी मंडळांनीही सहभाग घेतला. तसेच जीएसबी कम्युनिटी आयोजित या पंढरपूर फेस्टिव्हलमध्ये कन्नड, गुजराती, मल्याळी भाषिकांनीही सहभाग घेत विठुनामाचा गजर केला.
घे कुशीत गा माउली!
By admin | Updated: July 28, 2015 01:31 IST