Join us

शाळा परिसरातील बार व मद्य विक्रीवर तातडीने कारवाई करा; मंत्री शंभूराज देसाई यांचे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2024 08:16 IST

मंत्रालयातील दालनात राज्य उत्पादन शुल्कमंत्री देसाई यांनी ठाणे, डोंबिवली, कल्याण व पनवेलसह रायगड येथील स्थितीचा आढावा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पनवेल, कल्याण, डोंबिवली या शहरांत काही ठिकाणी शाळा परिसरात बार व मद्य विक्री सुरू असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर सरकारला जाग आली असून, अशा बार आणि मद्य विक्रीवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. 

मंत्रालयातील दालनात राज्य उत्पादन शुल्कमंत्री देसाई यांनी ठाणे, डोंबिवली, कल्याण व पनवेलसह रायगड येथील स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीस विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार, ठाणे जिल्हा अधीक्षक नीलेश सांगडे, रायगड जिल्हा अधीक्षक कोल्हे उपस्थित होते. 

शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, बस स्थानक, राष्ट्रीय महामार्गाच्या ७५ मीटर अंतराच्या परिसरात हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये मद्य विक्रीस बंदी असल्याचा नियम आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी करा. कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीर मद्यविक्री होऊ देऊ नये. विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करावी आणि बेकायदेशीरपणे व नियम डावलून सुरू असणाऱ्या बार व हॉटेलवर तातडीने कारवाई करावी, अशा सूचना देसाई यांनी यावेळी दिल्या.  

टॅग्स :शंभूराज देसाई