Join us
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा ऑफलाईनच घ्या, पण सध्या नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:07 IST

मराठी शाळा संस्थाचालक संघाची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आजच्या परिस्थितीत सरकार घेत असलेले निर्णय व झपाट्याने वाढणारी ...

मराठी शाळा संस्थाचालक संघाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आजच्या परिस्थितीत सरकार घेत असलेले निर्णय व झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या पाहता शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षांबाबत घाईने शेवटच्या टप्प्यात निर्णय न घेता त्या पुढे ढकलाव्यात अशी मागणी मराठी शाळा संस्थाचालक संघाने केली.

मूल्यमापन व परीक्षेचे स्वरूप शिथिल करून मुक्त वातावरणात परीक्षा घेण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने विचार करावा, यामध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचाही अंतर्भाव असावा असे मत संघाने मांडले. मराठी शाळा संस्थाचालकांची ही भूमिका आपण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाच्या स्वरूपात मांडल्याची माहिती मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्रकाश परब यांनी दिली.

परीक्षेच्या कार्याचे विकेंद्रीकरण करून स्थानिक पातळीवर विभागावर किंवा जिल्हानिहाय जिथे परीक्षा घेण्यायोग्य परिस्थिती आहे अशा ठिकाणी परीक्षा घेण्यासोबत पेपर तपासणीसुद्धा स्थानिक पातळीवर करता येईल का, असा विचार शिक्षण विभागाने करायला हवा. तसेच परीक्षेचे नियोजन करण्याआधी कोणत्याही वयोगटाचा विचार न करता सर्व शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सरसकट लसीकरण करून विद्यार्थ्यांच्याही लसीकरणासाठी विचार व्हावा असे मत शाळा संस्थाचालकांनी मांडले.

७ एप्रिल रोजी मराठी शाळा संस्थाचालक संघाची बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली. त्यात राज्याच्या सहा ते सात जिल्ह्यांतील २५ ते ३० मराठी शाळा संस्थाचालकांनी सहभाग नोंदविला होता. ग्रामीण भागातील परिस्थिती, कनेक्टिव्हिटी, तसेच गुणवत्तेचा विचार करता दहावी, बारावीच्या परीक्षा या ऑफलाईनच होणे अपेक्षित आहे; मात्र त्या सद्य:परिस्थिती विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात घालून, त्यांना मानसिक ताण देऊन घेऊ नका, असे संस्थाचालकांचे मत असल्याचे शाळा संस्थाचालक संघाचे समन्वयक सुशील शेजुळे यांनी सांगितले.

....................