मुंबई : रस्ते अपघातात गेल्या काही वर्षांत अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर करा, असे आवाहन करत चेंबूरमधील पालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज अनेक वाहनचालकांना तीळगूळ देऊन वाहतुकीचे नियम पाळण्याची विनंती केली. मुंबई पोलिसांकडून सध्या शहरात वाहतूक पंधरवडा सुरू आहे. शहरात अनेक दुचाकीस्वार हेल्मेट न घालताच दुचाकीवरून प्रवास करतात. त्यामुळे अपघात झाल्यानंतर डोक्याला मार लागून अनेकांना जीव गमवावा लागतो. तसेच कार चालकांनी सेफ्टी बेल्ट लावूनच प्रवास करणे बंधनकारक आहे. मात्र वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत अनेक जण बेधडकपणे प्रवास करतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत रस्ते अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हीच बाब लक्षात घेऊन चेंबूरच्या वाशीनाका परिसरात असलेल्या अयोध्या नगरातील पालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज मकरसंक्रांतीचे औचित्य साधून वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्याचे ठरवले. दादरच्या कीर्ती महाविद्यालयातील एनएसएसच्या काही विद्यार्थ्यांच्या मदतीने चेंबूर परिसरात आज हा उपक्रम राबवण्यात आला होता. या वेळी चिमुरड्यांनी वाहतुकीचे नियम असलेले फलक हातात घेऊन वाहनचालकांना तीळगूळ दिले. तसेच वाहतुकीचे नियम पाळा आणि स्वत:चा आणि कुटुंबीयांचा जीव वाचवा, असा सल्लादेखील त्यांच्याकडून दिला जात होता.आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या या चिमुरड्यांकडून असा सल्ला मिळत असल्याने काही दुचाकीस्वारांनी तत्काळ गाडीला अडकवलेले हेल्मेट डोक्यात परिधान केले. तर काही दुचाकीस्वारांनी यापुढे हेल्मेट घालूनच प्रवास करण्याचे आश्वासन या विद्यार्थ्यांना दिले. (प्रतिनिधी)
तीळगूळ घ्या...वाहतुकीचे नियम पाळा
By admin | Updated: January 16, 2015 03:31 IST