Join us
Daily Top 2Weekly Top 5

सांभाळा; काेरानामुक्तीनंतर हाेऊ शकतात ताेंडाचे आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:06 IST

मौखिक आरोग्य जपणे गरजेचे; दंतशल्य विभागातील डॉक्टरांच्या संशोधन अहवालपोस्ट कोविड आजार मालिकाभाग २स्नेहा माेरेलोकमत न्यूज ...

मौखिक आरोग्य जपणे गरजेचे; दंतशल्य विभागातील डॉक्टरांच्या संशोधन अहवाल

पोस्ट कोविड आजार मालिका

भाग २

स्नेहा माेरे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुक्तीनंतर बराच काळ मानसिक आराेग्यविषयक समस्यांना रुग्णांना तोंड द्यावे लागते. त्याचप्रमाणे आता कोरोनानंतर मौखिक आरोग्य जपणेही गरजेचे असल्याचे नुकतेच समोर आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या तोंडामध्ये विविध प्रकारचे अल्सर, तोंडाची आग होणे, टॉन्सिल्स, तोंडातील कोपऱ्यांमध्ये जळजळ होणे, जीभ कोरडी पडणे, हिरड्यांना सूज येणे याचबरोबर तोंडाचे विविध संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात दंतशल्य विभागातील डॉक्टरांच्या संशोधन अहवालाअंती ही बाब समोर आली आहे.

कोरोनामुक्तीनंतर रुग्ण तोंडाच्या आजाराने त्रस्त होत असल्याचे सिद्ध करण्यासाठी डॉक्टरांच्या तुकडीने १०१ रुग्णांच्या तोंडातील आजारांचा अभ्यास केला. यामध्ये ३९ रुग्णांमध्ये प्राथमिक तपासणीमध्ये तोंडाचे आजार असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये विविध प्रकारच्या अल्सरने रुग्ण त्रस्त असल्याचे दिसून आले. त्यातही रुग्णांना अफथॉस अल्सरचा त्रास अधिक होत होता. हरपेटिक आणि अफथॉस अल्सर हे प्रामुख्याने संसर्गाने येणारा मानसिक तणाव, विलगीकरण आणि रोगचिकित्सा यामुळे होतो. त्यामुळे कोरोना झाल्यानंतर रुग्णांमध्ये वाढणाऱ्या मानसिक तणावाचा परिणाम त्यांच्या तोंडातील अल्सरचे प्रमाण वाढण्यात होत असल्याचे संशोधनात दिसून आले.

कोरोना झालेल्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांचे प्रमाण आणि विलगीकरणामुळे येणारे मानसिक तणाव हे कोरोना रुग्णांचे तोंडातील आजार बळावण्यासाठी अधिक कारणीभूत ठरत असल्याचे दिसून आले आहे.

* औषधांमुळे होते ॲलर्जी

कोरोनाबाधितांच्या तोंडात जळजळ आणि महत्त्वाचे म्हणजे टॉन्सिल्स, तोंडातील कोपऱ्यांमध्ये जळजळ, संसर्ग, जीभ कोरडी पडणे, हिरड्यांना सूज येणे अशी लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून आली. यामध्ये काही रुग्णांना रिटोनावीर आणि फेविपीरावीर या औषधांची अ‍ॅलर्जी झाल्याचे दिसून आले. संशोधनाचा निष्कर्ष लक्षात घेऊन आता सायन रुग्णालयातील डेंटल विभागाच्या डॉक्टरांच्या तुकडीने यावर अधिक व्यापक स्वरूपात संशोधन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील काही दिवसांमध्ये मोठ्या रुग्णसंख्येचा अभ्यास करून ही लक्षणे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव नाकाद्वारे होत असल्याने तोंडामध्ये त्याचे परिणाम वाढत आहेत. त्यामुळे तोंडातील आजारांवर वेळेवर उपचार न केल्यास रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो. या संशोधनाने कोरोनाच्या उपचारांना वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

- डॉ. हेमंत धुसिया, दंतशल्य विभाग प्रमुख, सायन रुग्णालय

* काय काळजी घ्याल?

- कोरोनानंतर दाताच्या कोणत्याही समस्या उद्भवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

- दात, हिरड्या किंवा तोंडाच्या अन्य कुठल्याही समस्येवर घरगुती उपाय करू नका.

- तोंडाच्या कुठल्याही समस्येकडे प्राथमिक पातळीवर लक्ष द्या, उशिराने निदान होऊ देऊ नका.

- कोरोनानंतरही शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी संतुलित आहार, व्यायाम, सकारात्मक विचारसरणीवर भर द्या, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

---------------------------------------