Join us

प्रत्यक्ष रीडिंग घेऊन, त्यानुसार बिले दुरुस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:06 IST

महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वीज मीटर बंद असलेले लाखो ग्राहक आहेत, त्यांच्यावरही ...

महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वीज मीटर बंद असलेले लाखो ग्राहक आहेत, त्यांच्यावरही सरासरी १०० ते १२५ युनिट्स आकारणी होत आहे. या पद्धतीने वाढलेली बिले दुरुस्त करण्यासाठी जेथे विनामीटर जोडणी आहे, तेथे खरा जोडभार तपासून त्यानुसार बिले दुरुस्त करावीत. जेथे मीटर आहेत व सुरु आहेत, तेथे प्रत्यक्ष रीडींग घेऊन त्यानुसार बिले दुरुस्त करावीत, अशी मागणी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केली आहे.

मीटर बंद आहेत, अशा ठिकाणी मागील मीटर चालू कालावधीतील वीज वापर गृहीत धरून, त्यानुसार संपूर्ण कालावधीचा वीजवापर व त्यानुसार बिले दुरुस्त करावीत. जेथे मीटर पूर्ण काळ बंद आहे व प्रत्यक्ष वीजवापर तपासता येत नाही, अशा ठिकाणी त्या फीडरवरून दिलेली वीज व त्या फीडरवरील खरा जोडभार या आधारे सरासरी वीजवापर व त्यानुसार बिले निश्चित करावीत, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.

कृषी संजीवनी योजनांपैकी फक्त २००४ ची योजना यशस्वी झाली. चुकीची व दुप्पट वीज बिले या कारणामुळेच इतर दोन्ही योजना पूर्णपणे फसल्या. शेतकरी ग्राहकांची वीजबिले अचूक दुरुस्त झाली, तर ते निश्चितपणे योजनेत सहभागी होतील. याशिवाय मागील सर्व योजनांमध्ये थकीत मुद्दल रकमेवरील सर्व व्याज रद्द केले होते. यावेळी मात्र मागील ५ वर्षांचे व्याज आकारले जाणार आहे. योजना १०० टक्के यशस्वी होण्यासाठी हे व्याजही रद्द करावे, अशी मागणी केल्याचे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले.

........................