Join us
Daily Top 2Weekly Top 5

ध्वनिप्रदूषण होणार नाही यादृष्टीने कार्यवाही करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या समस्येमुळे ऑफिसची कामे, मुलांच्या ऑनलाइन शाळा, कॉलेज, इतर कामे घरातून केली जातात. आवाजाची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या समस्येमुळे ऑफिसची कामे, मुलांच्या ऑनलाइन शाळा, कॉलेज, इतर कामे घरातून केली जातात. आवाजाची तीव्रता अधिक असल्याने नागरिक त्रस्त आहेत. याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार प्राप्त होत आहेत. या समस्यांबाबत पोलिसांकडे बैठका घेण्यात आल्या आहेत, असे आमदार मंगेश कुडाळकर यांनी कुर्ला पूर्वेकडील नेहरूनगर येथील आवाजाने होत असलेल्या ध्वनिप्रदूषणाबाबत सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंगेश कुडाळकर यांनी कुर्ला (पूर्व) येथील नेहरू नगरमधील आवाजाने होत असलेल्या ध्वनिप्रदूषणाबाबत निवेदन सादर केले. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज आहे. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी यंत्रणांनी नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश नीलम गोऱ्हे यांनी दिले. सर्व समाजातील सण-उत्सव सतत सुरू असतात. परवानगीबाबत शहानिशा करून ध्वनिप्रदूषण होणार नाही यादृष्टीने कार्यवाही करावी. शांतता समिती बैठकीत सर्व समाजातील लोकांना विश्वासात घेऊन आवाज नियमानुसार असावा यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, पोलीस विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश गोऱ्हे यांनी दिले.

-------------

ध्वनिप्रदूषणासंदर्भात १० मिनिटांचे सादरीकरण करावे. जनतेमध्ये जागृती करावी. न्यायालयाच्या निर्णयांचा अभ्यास करावा. पोलिसांनी ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी योग्य कार्यवाही करावी.

- डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद

-------------