Join us  

ताडदेवमध्ये पोलिसाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 6:25 AM

‘नो एन्ट्री’मधून कार आणल्याप्रकरणी कारवाई करत असताना, ताडदेव वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

मुंबई : ‘नो एन्ट्री’मधून कार आणल्याप्रकरणी कारवाई करत असताना, ताडदेव वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी व्यावसायिक बाप-लेकाला गावदेवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शनिवारी न्यायालयाने दोघांनाही १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास ताडदेव वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार सानप हे वाहतुकीचे नियोजन करत होते. त्याच दरम्यान जय मुनमानी हे मुलगा जशन आणि पत्नीसोबत कारने (कार क्रमांक एमएच ०१ बीव्हाय १६२९) नो एन्ट्रीमधून येताना दिसले. सानप यांनी त्यांना हटकताच, बाप-लेकाने त्यांना धक्काबुकी केली. त्यानंतर ते फोटो काढत असताना त्यांना मारहाण केली.स्थानिकांनी मध्यस्थी करत त्यांना अडविले. या प्रकारामुळे परिसरात वाहतूककोंडीची समस्याही निर्माण झाली होती. या प्रकरणी सानप यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुनमानीविरुद्ध सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण, शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.शनिवारी या मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाले. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. शनिवारी दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गावदेवी पोलीस अधिक तपास करत आहेत.