Join us  

तलवारी म्यान, कार्यकर्ते पांगले, प्रतीक्षा उद्याची

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 2:37 AM

शेवटच्या तासापर्यंत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरु होती. कुठे रोड शो तर कुठे शोभा यात्रेद्वारे शक्तिप्रदर्शन केले जात होते

मुंबई : शेवटच्या तासापर्यंत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरु होती. कुठे रोड शो तर कुठे शोभा यात्रेद्वारे शक्तिप्रदर्शन केले जात होते. गल्लोगल्ली उन्हातान्हात आपल्या उमेदवारासाठी प्रचार करीत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांचा जोशही शिगेला पोहोचला होता. एखाद्या चौकात आरोप-प्रत्यरोप रंगत होते, दुपारनंतर शहरभर निघालेल्या बाईक रॅलींनी संपूर्ण मुंबई चौरंगी झाली. आणि घड्याळाचे काटे पाचवर पोहोचताच तलवारी म्यान झाल्या, कार्यकर्ते पांगले, गेले महिनाभर धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी मुंबईतील सहा जागांसाठी मतदान होणार आहे. आपली उमेदवारी निश्चित असलेल्या उमेदवारांनी जवळपास महिन्याभरापूर्वीच विविध मार्गाने आपला प्रचार सुरु केला होता. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, रहिवाशी, संघटनांबरोबर चर्चा सुरु होत्या. १३ एप्रिल रोजी अंतिम यादीद्वारे प्रतिस्पर्धींचे चित्र स्पष्ट होताच राजकीय युद्धच सुरु झाले. कार्यकर्त्यांची फौज घेऊन उमेदवार मैदान उतरले आणि प्रचाराने वेग घेतला. आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गल्लीतून मतदाराचे दार ठोठावत उमेदवार फिरु लागले.

या प्रचार मोहिमेत सोशल वॉरने मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघाले. वायरल होणारे व्हिडिओ, प्रतिस्पर्धी उमेदवाराचा खुलासा, त्यावरुन रंगणाऱ्या विनोदामुळे सोशल मिडियावर धमाल उडाली. हायटेक तरुणाईलाही निवडणुकीचे अपडेट्स मिळत राहिल्याने तेही एक्टिव्ह झाले. ह्यऐ लाव रे तो व्हिडिओह्णने निवडणुकीच्या माहोलात नवीन ट्रेण्ड आणला. नाक्यानाक्यावर निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या. ऐरव्ही या चर्चांपासून लांब राहणारे सर्वसामान्य मुंबईकरही उत्सुकतेपोटी राजकीय सभांना हजेरी लावू लागले. 

आता होणार छुपा प्रचार...प्रत्यक्ष प्रचार संपला तरी पुढील २४ तास छुप्या मार्गाने उमेदवारांचा प्रचार होण्याची शक्यता आहे. महिन्याभराच्या प्रचारानंतर उमेदवारांना आपले बलस्थान व कुठे घात होणार? याचा अंदाज येतो. त्यामुळे मतदारांना खूश करण्यासाठी उद्या अनेक छुपे प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :लोकसभा निवडणूकनिवडणूक