मुंबई : जानेवारी महिन्यापासून स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. मात्र मुंबईतील एकाही रुग्णाचा आजवर मृत्यू झाला नव्हता. सोमवार, १६ फेब्रुवारी रोजी अंधेरी येथील ५०वर्षीय व्यक्तीचा कस्तूरबा रुग्णालयात मृत्यू झाल्याने तो मुंबईतील स्वाइनचा पहिला बळी ठरला आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत मुंबईत स्वाइनचे ११४ रुग्ण आढळले. सोमवारी मृत्यू झालेल्या व्यक्तीत १० फेब्रुवारीपासून स्वाइनची लक्षणे आढळली. ११ फेब्रुवारीला त्या व्यक्तीला आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने १४ फेब्रुवारी रोजी कस्तूरबा रुग्णालयात दाखल केले गेले. त्यांच्यावर उपचार सुरू होते; पण स्वाइनच्या व्हायरसचा परिणाम त्याच्या श्वसन यंत्रणेवर झाला. गुंतागुंत वाढल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेने दिली. (प्रतिनिधी)