मुंबई : आॅगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली असली तरीही साथीच्या आजारांच्या रुग्णांचा आलेख चढता आहे. आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात स्वाइन फ्लूचे २१५, गॅस्ट्रोचे २२० आणि मलेरियाचे २०० रुग्ण आढळून आले आहेत. आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मलेरिया, स्वाइन फ्लू, गॅस्ट्रोचे दररोज सरासरी २० ते २५ रुग्ण आढळून आले आहेत. अधूनमधून येणारा पाऊस आणि नंतर वाढणाऱ्या तापमानामुळे मुंबईकरांना ताप चढला होता. एका आठवड्यात तापाचे २ हजार १२० रुग्ण आढळून आले आहेत. लेप्टोचे १५, डेंग्यूचे २३, टायफॉईडचे ३० आणि काविळीचे ३० रुग्ण आढळून आले आहेत. जुलै महिन्यापासून आढळून येत असलेल्या स्वाइनच्या रुग्णांची संख्या आॅगस्ट महिन्यातही कमी झालेली नाही. महापालिका स्वाइन फ्लू रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखत आहे. आतापर्यंत ४१७ गर्भवती महिलांना स्वाइन फ्लूची लस देण्यात आली आहे. कस्तूरबा रुग्णालय आणि प्रभादेवी, भांडुप, ओशिवरा प्रसूतिगृहांमध्ये स्वाइन फ्लूचे लसीकरण केले जाते. आता नायर, केईएम, सायन आणि जे. जे. रुग्णालयातही लसीकरण केले जाणार आहे. खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना स्वाइन फ्लूविषयी महापालिकेने प्रशिक्षण दिले. या डॉक्टरांना डेंग्यू, मलेरिया, लेप्टो आणि स्वाइनच्या उपचारांची मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)
आठ दिवसांत स्वाइनचे २१५ रुग्ण
By admin | Updated: September 3, 2015 01:18 IST