Join us

स्वामी समर्थ, साहसी संघ उपांत्य फेरीत

By admin | Updated: April 25, 2017 01:48 IST

अटीतटीच्या झालेल्या सामन्यात स्वामी समर्थ संघाने वीर परशुराम संघावर २५-२४ असा अवघ्या एका गुणाने विजय मिळवला

मुंबई : अटीतटीच्या झालेल्या सामन्यात स्वामी समर्थ संघाने वीर परशुराम संघावर २५-२४ असा अवघ्या एका गुणाने विजय मिळवला. या विजयाच्या जोरावर समर्थ संघाने ओम भारत कबड्डी स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. अन्य सामन्यात साहसी संघाने मुलुंड क्रीडा केंद्रावर सोपा विजय मिळवत, उपांत्य फेरी गाठली.वांद्रे-खार येथील निर्मलनगरमध्ये स्पर्धेचे सामने खेळवण्यात आले. उपांत्यपूर्व सामन्यात स्वामी समर्थ आणि साहसी संघ यांच्यात ‘काँटे-की-टक्कर’ असा सामना झाला. दोन्ही संघानी सुरुवातीला बचावात्मक पवित्रा घेतल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली. ९-९ अशा मध्यांतरानंतर वेगवान खेळाला सुरुवात झाली. समर्थ संघाच्या नितीन गिजे आणि दर्शन राऊत यांच्या खेळाला परशुराम संघाच्या आदेश सावंत, चेतन पालवणकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले. शेवटपर्यंत रंगतदार अवस्थेत असलेल्या सामन्यात समर्थ संघाने अवघ्या एका गुणाने बाजी मारली.दुसऱ्या बाजूला साहसी (चेंबूर) संघ आणि मुलुंड क्रीडा केंद्र यांच्यातील सामन्यात साहसी संघाने २५-१२ असा सोपा विजय मिळवला. सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून साहसी संघाच्या आतिष शिंदे (चढाई) आणि नीलेश उगले (पकड) यांनी शानदार कामगिरी केली. केंद्राने मध्यांतराला १४-५ अशी आघाडी घेतली. अपेक्षेनुसार मुलुंड संघाने मोठ्या फरकाने सोप्या विजयाची नोंद केली. (क्रीडा प्रतिनिधी)