Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानाला आयुक्तांनी फासला हरताळ, भाजपाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 05:05 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला पालिका आयुक्त हरताळ फासत असल्याचा आरोप भाजपाने स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी केला.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला पालिका आयुक्त हरताळ फासत असल्याचा आरोप भाजपाने स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी केला. मुंबईतील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था आहे. अडीच वर्षांची मुदत देऊनही ठेकेदाराने शौचालयांचे काम केले नाही. त्यामुळे तीन महिने मुदतवाढ देण्यास विरोध दर्शवित शौचालयांच्या कामाची श्वेतपत्रिका प्रशासनाकडून मागविण्यात आली आहे.सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील शौचालयांच्या दुरवस्थेप्रकरणी पालिका प्रशासनाला धारेवर धरले. मुंबईत केवळ ४० टक्के मलनिस्सारण वाहिन्या आहेत. त्यामुळे शौचालय बांधण्यात अडथळा येत आहे. गेल्या अडीच वर्षांत पाच हजार शौचालये बांधण्यात येणार होती. तीन महिन्यांत २२ हजार शौचालये ठेकेदार कसे बांधणार, असा सवाल स्वपक्षीय नगरसेवकांनी केला. ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने शौचालयांची कामे केली जात आहेत. आरसीसीची शौचालये न बांधता पत्र्याच्या शेडचीच शौचालये बांधावीत, अशी मागणी सदस्यांनी केली. बहुतांश शौचालये १८ वर्षे जुनी आहेत. एक शौचालय बांधण्यास सुमारे ५० लाख रुपये खर्च येतो. मात्र शौचालयाचे काम निकृष्ट दर्जाचे केले जाते, असा आरोप महापालिका विरोधी पक्ष नेते रविराजा यांनी केला.१५ हजार नवी शौचालये प्रस्तावितमुंबईत ११ हजार १७० शौचालये जुनी आहेत. त्या जागेवर १५ हजार ७७४ नवीन शौचालये बांधण्यात येणार आहेत.मुंबईत सध्या ४५ हजार शौचालये आहेत. यापैकी बहुतांश शौचालये १८ वर्षे जुनी आहेत. त्यामुळे त्यांची दुरवस्था झाली आहे.मुंबईत ५,१७० शौचकूप बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी १,६९० शौचकूप बांधली आहेत. १,८२० प्रगतिपथावर असून १,०३५ नवीन शौचकूपांचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दिली.म्हाडाची शौचालये अद्याप हस्तांतरित झालेली नाहीत. विभागातील शौचालयांची साफसफाई करण्यासाठी सीपी लॉरी यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.‘पुढील बैठकीत प्रस्ताव सादर करा’मुंबईतील सार्वजनिक शौचालयांबाबत सविस्तर माहिती देणारी श्वेतपत्रिका प्रशासनाने सादर करावी, अशी मागणी भाजपाने केली. प्रशासनाने पुढील बैठकीत सविस्तर माहिती घेत प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

टॅग्स :स्वच्छ भारत अभियानमुंबई