Join us  

पालिका इमारतीत दिवसा भरणाऱ्या शाळांच्या १० % भाडेवाढ धोरणाला ५ वर्षासाठी स्थगिती, मुंबई पालिका आयुक्तांचे निर्देश

By मनोहर कुंभेजकर | Published: October 22, 2023 12:23 PM

या वर्षीचा वर्ग भाडेदर पुढील ५ वर्ष कायम राहील असे निर्देश यावेळी पालिका आयुक्तांनी दिले. 

मुंबई महानगरपालिकेच्या दि,1 जानेवारी 2008 च्या आदेशानुसार वर्ग खोल्यांसाठी 10 टक्के वाढीव वार्षिक भाडे आकारले जाते. सदर मासिक तासांकरिता एका वर्गाकरिता 500 रुपये भाडे होते. ते आता 4000 रुपयां पर्यंत वाढवले आहे.

मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून अशा मराठी माध्यमांच्या शासनमान्य खाजगी शाळा व सलग्न ज्युनियर कॉलेजला राज्य शासनाच्या मराठी भाषा संवर्धन धोरणानुसार नाममात्र भाडे आकारण्यात यावे, अशी मागणी राज्याच्या कूपोषण निर्मूलन कृती दलाचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांच्या सह महामुंबई शिक्षण संस्था संघटना, मुंबई(रजि)चे कार्यवाह सदानंद रावराणे व सहकार्यवाह डॉ. विनय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून त्यांना निवेदन देत केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार डॉ दीपक सावंत, सदानंद रावराणे व डॉ.विनय राऊत यांनी महापालिका आयुक्त डॉ.इकबाल सिंह चहल यांची भेट घेऊन पालिका इमारतीत वार्षिक भाडे तत्वावर सुरू असलेल्या दिवसा भरणाऱ्या शाळांचे प्रत्येक वर्षीचे १० % भाडेवाढ धोरण पुढील ५ वर्षासाठी स्थगित करण्याची मागणी केली. या वर्षीचा वर्ग भाडेदर पुढील ५ वर्ष कायम राहील असे निर्देश यावेळी पालिका आयुक्तांनी दिले. 

मुंबई महानगरपालिका चालवीत असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी झाल्याने अशा शालेय इमारतींतील वर्ग खोल्या खाजगी शाळेचे वर्ग भरवण्याकरिता भाडेतत्वावर देण्याचे धोरण पालिकेने गेल्या 30 वर्षांपासून अंगिकारले आहे. आजमितीस सुमारे 220 खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळेचे वर्ग हे मुंबई महानगरपालिकेच्या शालेय इमारतींमध्ये भाडेतत्वावर चालवले जातात.यामध्ये मराठी, हिंदी,गुजराथी व उर्दू माध्यमांच्या अनुदानित आणि विना अनुदानित खाजगी शाळांचा समावेश आहे. या शाळांमधील विद्यार्थी संख्या सुमारे 25000 असून अंदाजे 1500 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या शाळांमध्ये कार्यरत आहे.या खाजगी शिक्षण संसथा या पालिकेच्या सदर शालेय इमारतींतील वर्गखोल्यांची दुरुस्ती व देखभाल सुद्धा वेळोवेळी करतात असे निवेदनात नमूद केले आहे. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाशाळादीपक सावंत