Join us  

एसटीतून विनापरवानगी पार्सल नेल्यास चालक-वाहकांचे निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 5:48 AM

महामंडळाच्या माहितीनुसार, काही चालक व वाहक खासगी व्यक्तींमार्फत पार्सल, कुरियर किंवा सामान स्वीकारत असल्याचे निदर्शनास आले आहे.

मुंबई : एसटीमधून खासगी व्यक्तींमार्फत पार्सल किंवा कुरियर स्वीकारून वाहतूक करणाऱ्या चालक व वाहकांवर आता निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय महामंडळाने जाहीर केला आहे. तसे पत्र सर्व विभाग नियंत्रकांना एसटीचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकाºयांनी पाठवले आहे. कर्जत-आपटा एसटीत सापडलेल्या आयईडी बॉम्बच्या पार्श्वभूमीवर महामंडळाने तातडीने हा निर्णय जाहीर केला आहे.

महामंडळाच्या माहितीनुसार, काही चालक व वाहक खासगी व्यक्तींमार्फत पार्सल, कुरियर किंवा सामान स्वीकारत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुळात अनधिकृतपणे सामानाची वाहतूक करू नये, असे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत. तरीही त्याचे उल्लंघन होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. परिणामी, एसटीमध्ये स्फोटक वस्तूंची वाहतूक करून देशविघातक कारवाया घडवण्याची शक्यता महामंडळाने व्यक्त केली आहे. तसेच याबाबत आगार व्यवस्थापकांनी विभागातील चालक व वाहकांना स्पष्ट सूचना देण्यास महामंडळाने सांगितले आहे. जे चालक किंवा वाहक अनधिकृतपणे पार्सलची वाहतूक करतील, त्याविरोधात निलंबनाची कारवाईचे आदेश महामंडळाने दिले आहेत. चालक व वाहक पार्सल डेपोव्यतिरिक्त अशा प्रकारे सामानाची वाहतूक करत नसल्याचा दावा एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी केला आहे. रेडकर म्हणाले की, एखादी अपवादात्मक घटना वगळता वाहकांचे प्रवाशांच्या सामानावर बारीक लक्ष असते. त्यामुळे या निर्णयानंतर चालक व वाहक अधिक सतर्क राहतील, यात शंका नाही.