Join us

पळून जाणारा वाहन निरीक्षक निलंबित!

By admin | Updated: December 28, 2014 01:49 IST

पळून जाणाऱ्या सहायक मोटार वाहन निरीक्षक समाधान जाधव यांना निलंबित करण्यात आले

मुंबई : परिवहन आयुक्तांनी अचानक ट्रकमधून उतरत सीमा तपासणी नाक्यावर टाकलेल्या धाडीच्या वेळी त्यांना पाहून पळून जाणाऱ्या सहायक मोटार वाहन निरीक्षक समाधान जाधव यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे आरटीओमध्ये खळबळ उडाली आहे.परिवहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावर दररोज तब्बल २० लाखांची मलई जमा होत असल्याची माहिती आयुक्त महेश झगडे यांनी टाकलेल्या धाडीतून समोर आली होती. ट्रकमधे बसून आयुक्त आणि त्यांचा बॉडीगार्ड गुजरात बॉर्डरवरील अच्छाड सीमा तपासणी नाक्यावर गेले होते. ट्रकमधून आयुक्त उतरताना पाहून ड्रेसवर असलेले वाहन निरीक्षक जाधव पळून गेले होते. एखाद्या हिंदी सिनेमात शोभावी या धाडीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. अच्छाड नाक्याचा रस्ता आठ पदरी आहे. पहिल्या दोन लेनमधून ओव्हरलोड ट्रक जात होते. आयुक्त ज्या ट्रकमधून गेले होते त्या ट्रक चालकाकडून ३०० रुपये लाच घेतली गेली होती. ट्रकमधून खाली उतरलेले आयुक्त पाहताच ‘रेड पडली, रेड पडली’ असे म्हणत सगळे दलाल आणि ड्रेस घातलेला अधिकारीदेखील सुसाट पळत सुटले होते. अधिकाऱ्यांना दप्तर टाकून पळताना पाहून ट्रक ड्रायव्हरच टाळ्या वाजवत होते. (विशेष प्रतिनिधी)