Join us

एसटी जळीत प्रकरणात मॅकेनिक निलंबित

By admin | Updated: December 14, 2014 23:10 IST

एसटी महामंडळाकडून याबाबतची रीतसर चौकशी पूर्ण होऊन अखेर मुरुड आगारातील इलेक्ट्रीक मॅकेनिक शशिकांत निवाते निलंबित

नांदगाव : काही दिवसांपूर्वी मुरुड- महालोर ही एसटी गाडी शॉक सर्किटमुळे आग लागून भस्मसात झाली होती. एसटी महामंडळाकडून याबाबतची रीतसर चौकशी पूर्ण होऊन अखेर मुरुड आगारातील इलेक्ट्रीक मॅकेनिक शशिकांत निवाते यांना निलंबित करण्यात आले आहे.याबाबत आगार प्रमुखांना विचारले असता त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला. अपघात घडताच रायगड जिल्ह्याचे विभाग नियंत्रक गायकवाड यांनीही मुरुड आगाराला भेट दिली होती. एसटीला आग लागताच चालक महेंद्र पखाले यांनी गाडी चढावावर असल्याने हॅण्ड ब्रेकचा वापर करून गाडी थांबवत सहा प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले होते. अचानक गाडीने पेट घेतल्याने चालकांच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे जीव वाचले होते. गाडीत आग विझवण्याचे साधन होते, परंतु नेमक्या त्याच ठिकाणी आग भडकली.प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या चालकाचा सत्कार आगारामार्फत व्हावा, अशी इच्छा प्रवाशांची होती, मात्र आगार प्रमुख बोगरे यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आगार प्रमुखांनी तांत्रिक विभागाच्या कामाची तपासणी करावी, अशी मागणी प्रवासी संघटनेकडून होत आहे. (वार्ताहर)