Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकर यांच्यावर शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुरुवारी तातडीची बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुरुवारी तातडीची बायपास सर्जरी करण्यात आली आहे. सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी कळविले आहे, अशी माहिती पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी शुक्रवारी दिली.

प्रकाश आंबेडकर यांच्यावरील शस्त्रक्रियेनंतर आणखी अजून काही दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत पक्षाच्या माध्यमातून रोजच्या रोज माहिती दिली जाईल, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आंबेडकर यांच्यावर कोणत्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत याची माहिती देण्यात आली नाही. रुग्णालयात कार्यकर्त्यांची गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून ही खबरदारी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी सकाळी सोशल मीडियाद्वारे पक्षकार्यातून सुट्टी घेत असल्याची घोषणा केली होती. मात्र, सुट्टीचे कारण स्पष्ट न केल्याने विविध आडाखे बांधले जात होते. त्यानंतर पक्षाकडून नियमितपणे हेल्थ बुलेटीन जारी करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.