Join us  

आमचा सूर निरागस न हाेता नवीनच लागताे : फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 9:09 AM

पं. हरिप्रसाद चौरसिया, शंकर महादेवन, षड्ज गोडखिंडी, अभिलिप्सा पांडा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने सन्मानित

मुंबई : प्रख्यात गायक शंकर महादेवन ‘सूर निरागस हो...’ हे गीत गातात, तेव्हा त्यांचा सूर निरागस असताे. आम्ही आमचाही सूर निरागस करण्यासाठी प्रयत्न करतो; पण राजकारणामध्ये ते शक्य होत नाही.  अशी खूशखूशीत फटकेबाजी केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. 

सप्तसुरांची उपासना करणाऱ्या ज्योत्स्नावहिनींच्या आठवणीत १० वर्षांपूर्वी ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ सुरू करण्यात आला, ज्याची गणना आज देशातील आघाडीच्या पुरस्कारांमध्ये केली जाते. ‘सूर ज्योत्स्ना’ने देशातील कुशल कलाकारांना, गायकांना, संगीततज्ज्ञांना व्यासपीठ निर्माण करून त्यांची प्रतिभा जगासमोर आणण्याचे काम केले आहे. ज्योत्स्नावहिनींसाठी यापेक्षा योग्य कोणतीच श्रद्धांजली असू शकत नाही, अशी भावनाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. दहाव्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यात फडणवीस बोलत होते.

मंगळवारी मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये निमंत्रित रसिक, गायक, वादक आणि सूर-संगीताच्या मैफलीत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आले. या सोहळ्याला देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत लिजंड’ पुरस्कार पं. हरिप्रसाद चौरसिया यांना, ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत आयकॉन’ पुरस्कार शंकर महादेवन यांना, ‘सूर ज्योत्स्ना उदयोन्मुख प्रतिभा’ पुरस्कार बासरीवादक षड्ज गोडखिंडी यांना आणि ‘सूर ज्योत्स्ना उदयोन्मुख प्रतिभा’ पुरस्कार गायिका अभिलिप्सा पांडा यांना प्रदान करण्यात आले. एक लाख रुपये रोख, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. गायक रूपकुमार राठोड, गायिका सुनाली राठोड, गायिका गौरी येडवाडकर, पंचम निषादचे शशी व्यास यांनी ज्युरी म्हणून काम पाहिले. 

सुरांसोबत त्यांचे वेगळे नाते होते : ज्योत्स्ना स्वत: संगीताची पूजा करायच्या, आराधना करायच्या. त्यांनी स्वत:ला केवळ संगीतापुरते मर्यादित ठेवले नव्हते, तर सखी मंचासोबतच इतर विविध मंचांच्या माध्यमातून कित्येक स्त्रियांना, बऱ्याच कलाकारांना त्यांनी संगीतासोबत जोडले होते. सुरांसोबत त्यांचे वेगळे नाते होते. त्यामुळे त्यांच्या आठवणीत जेव्हा हा पुरस्कार दिला जातो, तेव्हा निश्चितच त्या जिथे कुठे असतील तिथे त्यांच्या आत्म्याला आनंद होत असेल.  

आज या मंचावर दोन दिग्गज आहेत. पं. हरुप्रसाद चौरसियांच्या बासरीने कित्येक दशकांपासून केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला मोहित केले आहे. मला असे वाटते की, त्यांच्यासारख्या व्यक्तीला जेव्हा आपण पुरस्कार देतो, तेव्हा त्या व्यक्तीची नव्हे, तर पुरस्काराची उंची वाढते. शंकर महादेवन खूप टॅलेंटेड आहेत. त्यांनी गीत-संगीताची केलेली सेवा अनोखी आहे. 

हा माझ्यासाठी खूप मोठा गौरव - शंकर महादेवन

१० वर्षांपूर्वी सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराची घोषणा झाल्यापासून मी या पुरस्कारासोबत आहे. या पुरस्कार सोहळ्यात परफॉर्म करणारा मी पहिला आर्टिस्ट असल्याचे सांगताना मला अभिमान वाटतो. या पुरस्कारासाठी मी योग्य आहे की नाही माहीत नाही, पण आज विनम्रपणे हा पुरस्कार स्वीकारतो. अजून जीवनात बरेच काही करायचे आहे. मागे वळून पाहताना असे लक्षात येते की, मी जे काम केले आहे, त्यासाठी हे प्रोत्साहन आहे. धन्यवाद... 

तुझे सब है पता... मेरी मां...ज्योत्स्ना वहिनींना मी ‘मेरी मां...’ हे गाणे समर्पित करतो. विजयबाबू आणि त्यांच्यासोबत मी खूप वेळा प्रवास केला आहे. त्या खूप चांगल्या व आदर्श पत्नी तर होत्याच; पण मायाळू माताही होत्या. आपले कुटुंब वाढवल्याने परफेक्टली बॅलन्स असलेल्या कुटुंबाच्या त्या आयकॉनिक लिजेंड बनल्या.

हा पुरस्कार आजोबांना समर्पित करतो - षड्ज गोडखिंडी सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय पुरस्काराच्या रूपात स्वप्न साकार झाले आहे. बासरीतील देव मानले जाणारे पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणे खूप भाग्याचे आहे. हा पुरस्कार माझे सर्वात मोठे प्रेरणास्थान असलेले आजोबा पं. वेंकटेश गोडखिंडी यांना अर्पण करतो. हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद वर्णन करण्यासाठी माझ्याकडे  शब्दच नाहीत. माझे वडील पं. प्रवीण गोडखिंडी आणि आई सारिका गोडखिंडी हे देखील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असणे माझ्यासाठी खूप खास आहे.

‘हर हर शंभू’ या तुफान व्हायरल झालेल्या गाण्यामुळे प्रकाशझोतात आलेल्या सूर ज्योत्स्ना पुरस्कार विजेत्या अभिलिप्सा पांडा यांनी ‘अजहून आए बालमा सावन बीता जाए’, छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा, हर हर शंभू आणि ओडिसा भाषेतील गाजलेले रंगबत्ती ही गाणी सादर केली. 

आजच्या पिढीतील कलाकार भाग्यवान - पं. हरिप्रसाद चौरसियामीदेखील दर्डा कुटुंबाचाच सदस्य आहे. खूप वर्षांपूर्वी या कुटुंबासोबत माझी भेट झाली होती, तेव्हापासून यांचा आशीर्वाद माझ्यावर आहे. दर्डा कुटुंब संगीतासाठी जे काम करत आहे ते आपल्या भावी पिढीसाठी खूप मोठे आहे. मी जेव्हा सुरुवात केली होती, तेव्हा असे कोणीच नव्हते. आजच्या पिढीतील कलाकार खूप भाग्यवान आहेत.

मी कायम ऋणी राहीन - अभिलिप्सा पांडा

इतक्या महान दिग्गजांसोबत व्यासपीठ शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. सुर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराच्या रूपात आशीर्वाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या पुरस्कारासाठी मी आपली कायम ऋणी राहीन. भविष्यातही असाच आशीर्वाद कायम राहो. आणखी खूप काही करायचे आहे.

तबला, बासरीची जुगलबंदी रंगली  पुरस्कार विजेते बासरीवादक षड्ज गोडखिंडी यांच्या सुमधूर बासरीवादनाने सूर ज्योत्स्ना पुरस्कार सोहळ्याची सुरुवात झाली. राग जोग आणि द्रुत तीन तालमध्ये बसरीवादन करत षड्ज यांनी रसिकांना मोहित केले. ओजस अढिया यांनी षड्ज यांना तबल्यावर साथ केली. बासरी आणि तबल्याची जुगलबंदी रसिकांची दाद मिळवून गेली. 

मान्यवरांची उपस्थितीया सोहळ्याला राज्याचे महिला व बालकल्याण आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लाेढा, ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा, ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, सखी मंचच्या अध्यक्षा आशू दर्डा, संगीता महादेवन, बँकर व गायिका अमृता फडणवीस, रिलायन्स समूहाचे कार्यकारी संचालक हितल मेस्वानी, बिजल मेस्वानी, रुणवाल बिल्डर्सचे सुभाष आणि चंदा रुणवाल, रिद्धीसिद्धी बुलियन्सचे पृथ्वीराज कोठारी, उद्योजक युवराज ढमाले, मोटिव्हेशनल स्पीकर गौर गोपाल दास, ब्राइट आउटडोअर मीडियाचे प्रमुख योगेश लखानी, आंतरराष्ट्रीय चित्रकार सुजाता बजाज, गझल गायिका मधुराणी जसदनवाला, अब्बासभाई जसदनवाला, रब्बानी मुस्तफा खान, भजनसम्राट अनुप जलोटा, वर्षा प्रफुल्ल पटेल, पुर्णा पटेल-सोनी, मीराभाईंदरचे पोलिस आयुक्त मधुकर पांडे, रुपकुमार आणि सुनाली राठोड, उद्योजक आणि नेहरु सेंटरचे ट्रस्टी नरेंद्र मुरकुंबी, अपार इंडस्ट्रीजचे चैतन्य देसाई, वेरिटास लीगलचे अभिजीत जोशी, इन्स्पिरा ग्रुपचे प्रकाश जैन, चेतन जैन, डॉ. राजीव शर्मा, डॉ. अश्विन मेहता, डॉ. अमिष दलाल, डॉ. नीता दलाल, चार्टर्ड अकाउंटंट जयेंद्र शहा, संदीप शहा, बांधकाम व्यावसायिक विजय रहेजा, माजी आमदार अतुल शहा, मालती जैन, कवी नारायण अगरवाल, प्रवीण गोडखिंडी, सारिका गोडखिंडी, राहुल यादवडकर, गायिका अंकिता जोशी, रमाकांत गायकवाड, बागेश्री गायकवाड, त्यागराज खाडीलकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

टॅग्स :सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारदेवेंद्र फडणवीस