Join us  

मुंबईत उद्या रंगणार सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा, पं. हृदयनाथ मंगेशकर यांना सूर ज्योत्स्ना सरस्वती पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 6:12 AM

sur jyotsna national music awards ceremony to be held in mumbai tomorrow : लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार दिले जातात.

मुंबई : संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव करणारा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा मंगळवारी सायंकाळी सायन येथील षण्मुखानंद सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार आहे. या सोहळ्यात ख्यातनाम गायक, संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सूर ज्योत्स्ना सरस्वती पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे; तसेच उदयोन्मुख गायक-गायिका प्रथमेश लघाटे आणि हरगून कौर यांचा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार दिले जातात. या पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी सहा वाजता सुरू होणाऱ्या देखण्या सोहळ्यात सूर, ताल आणि शब्द यांची अनोखी मैफल संगीत रसिकांना अनुभवता येणार आहे. संगीत क्षेत्रातील युवा आणि बहुमुखी प्रतिभांच्या सन्मान सोहळ्याचे हे सातवे वर्ष आहे. देशभरातील संगीत प्रतिभांना शोधून त्यांना प्रोत्साहित करणे हा या पुरस्काराचा मूळ उद्देश आहे. गेल्या सहा वर्षांत या मंचाने अनेक कलावंतांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल भावी वाटचालीकरिता प्रेरणा देण्याचे कार्य केले आहे.

भारतीय संगीतातील अमूल्य योगदानाबद्दल आदरांजलीभारतरत्न पं. भीमसेन जोशी पद्मविभूषण पं. जसराज पद्मविभूषण गुलाम मुस्तफा खान 

मास्कशिवाय प्रवेश नाहीकोरोनाचा काळ असल्याने सरकारने घालून दिलेल्या सर्व निर्बंधांचे पालन करत या सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे अंतर, नियमाचे पालन आणि मास्कचा वापर आवश्यक आहे. तापमान तपासणी केली जाणार असल्याने रसिकांनी नियोजित वेळेआधी सभागृहात पोहोचावे.

विशेष सन्मानया सोहळ्यात आनंदजी वीरजी शाह, हरिहरन, पं. सतीश व्यास, कैलाश खेर, अनुराधा पौडवाल, उदित नारायण, पं. अजय पोहनकर, रूपकुमार राठोड आणि सोनू निगम या संगीत क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.

यंदाचे विजेतेसुमधुर आवाज आणि सांगीतिक कौशल्याने भारतीयांवर जादू करणारी हरगून कौर व लहान वयातच स्वत:च्या गायकीने वेगळी ओळख निर्माण करणारा प्रथमेश लघाटे हे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २०२०चे विजेते ठरले आहेत.

सुरांची बरसात : पुरस्कार सोहळ्यात आर्या आंबेकर, पूजा गायतोंडे, अंकिता जोशी, एस. आकाश, शिखर नाद कुरेशी, ओजस अढिया आणि रमाकांत गायकवाड या तरुण वादक-गायकांच्या सुरांची रसिकांवर बरसात होणार आहे.

या मान्यवरांनी केली विजेत्यांची निवडगायक रूपकुमार आणि सोनाली राठोड, शास्त्रीय संगीत तज्ज्ञ शशी व्यास, लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा व टाइम्स म्युझिकच्या गौरी यादवडकर, सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल या मान्यवरांनी सातव्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे.

दिग्गजांची उपस्थितीसोहळ्यास राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार प्रफुल्ल पटेल, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, इतर मागासवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, इस्कॉनचे आध्यात्मिक गुरू गौर गोपालदास, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, महारेराचे प्रमुख अजोय मेहता, रेमंड ग्रुपचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, सेलो ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप राठोड, रवांडा देशाचे मानद दूत आणि इन्स्पायरा इंटरप्रायझेसचे चेअरमन प्रकाश जैन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

टॅग्स :सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारलोकमतमुंबई