Join us

मुख्यमंत्र्यांवरील टीकेचे उद्धव ठाकरेंकडून समर्थन

By admin | Updated: February 1, 2015 01:35 IST

शिवसेनेच्या मुखपत्रातून गेले काही दिवस सुरू असलेल्या भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेचे आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार समर्थन केले.

मुंबई : शिवसेनेच्या मुखपत्रातून गेले काही दिवस सुरू असलेल्या भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेचे आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार समर्थन केले. आमच्या मुखपत्रातून आम्ही भूमिका मांडत आहोतच. शिवाय मी योग्य वेळी योग्य ते बोलेन, असा सूचक इशाराही ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पत्रकारांशी बोलताना दिला. वृत्तपत्रातून आलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देण्याची आमची पद्धत नाही, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी बोलण्याचे टाळले होते. तथापि, सामनामधील भूमिका ही आपलीच असल्याचे सांगून उद्धव यांनी टीकेचे जोरदार समर्थन केले. मुख्यमंत्री फडणवीस आणि अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार विदर्भाचे आहेत तरीही शेतकरी विषाचा प्याला ओठी लावून जीवन संपवित असल्याची टीका मुखपत्रातून करण्यात आली होती. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मित्र पक्षाकडून अशी टीका सहन करणार नाही, असा सूचक इशारा दिल्याने भाजपा-शिवसेनेतील शीतयुद्ध तूर्तास तरी थांबण्याची लक्षणे दिसतनाहीत. (विशेष प्रतिनिधी)