Join us

नाल्यात पडून सुपरवायझर जखमी

By admin | Updated: July 7, 2014 00:01 IST

भगवान कडूबा पगारे वय २५, रा. महाड, मूळ रा. जालना हे कंपनीमधील पंपाचे बटन बंद करीत असताना शेजारील नाल्यामध्ये पडल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

बिरवाडी : महाड औद्योगिक वसाहतीमध्ये अपघाताची मालिका सुरू असताना कोप्रान प्रा.लि. कारखान्यामध्ये सुपरवायझर पदावर काम करणारे भगवान कडूबा पगारे वय २५, रा. महाड, मूळ रा. जालना हे कंपनीमधील पंपाचे बटन बंद करीत असताना शेजारील नाल्यामध्ये पडल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. याबाबत महाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकारी अशोक मेश्राम यांच्याशी भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधला असता त्यांनी अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला आहे.भगवान पगारे हे गेले दोन महिने कोप्रान प्रा.लि मध्ये सुपरवायझर म्हणून कार्यरत असून ४ जुलै रोजी रात्री ११ वा. ते कामावर आले. दरम्यान ६.३० वा. च्या सुमारास कंपनीमधील पंप बंद करायला जात असताना पंपाचा शाफ्ट त्यांच्या जिन्सपॅन्टमध्ये अडकल्याने ते शेजारील नाल्यामध्ये पडल्याने त्यांच्या पायाला गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून महाड शहरातील रानडे हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये अपघाताची मालिका सुरूच असून कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अपघाताची माहिती लपवून ठेवली जात असल्याने नेमका अपघात कशामुळे झाला त्याला जबाबदार कोण, कंपनी कारखान्यामध्ये कामगारांना सुरक्षा व्यवस्था पुरविली जाते का असे अनेक प्रश्न यामुळे कायम आहेत. याबाबत करखाना निरीक्षक यांनी अपघाताची माहिती लपविणाऱ्या कारखाना व्यवस्थापक विरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी औद्योगिक वसाहतीमधील कामगार वर्गातून होत आहे. (वार्ताहर)