दत्ता यादव- सातारा-- डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ यशस्वी केली. या लढ्याने अंधश्रद्धेची जळमटं काढून टाकण्याचे मोठे काम त्यांच्या हातून झाले. मात्र अंधश्रद्धेच्या आडोशाला लपून ज्यांचे पोट भरण्याचे काम सुरू होते, तो उद्योग डॉ. दाभोलकरांनी बंद पाडला. त्याच अंधश्रद्धाळूंनी दाभोलकरांचा खून केला असावा, अशी प्रतिक्रिया साताऱ्यातील युवा वर्गामधून व्यक्त होत आहे.डॉ. नरेंद्र दाभोलकर हे सातारचे असल्यामुळे युवा वर्गाला त्यांच्या खुनाच्या घटनेबाबत काय वाटते, याचा कानोसा घेतला असता बहुतांश युवकांनी डॉ. दाभोलकरांचा खून हा बुवाबाजी करणाऱ्या व्यक्तीकडूनच झाला असावा, असे मत अनेकांनी व्यक्त केले. दाभोलकरांनी अनेक बुवाबाजीची प्रकरणे चव्हाट्यावर आणली. यातील काहीजण दुखावले असतील, त्यांनीच हा घृणास्पद प्रकार केल्याची शक्यता आहे. विशेषत: सातारा पोलिसांनी या खूनप्रकरणामध्ये लक्ष घालण्याची गरज निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. जोपर्यंत त्यांच्या खुनाचा छडा लागत नाही. तोपर्यंत युवकांमध्ये अस्वस्थता असेल.डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी अंधश्रद्धा आणि श्रद्धा यातील फरक सांगण्यासाठी अख्ख्यं आयुष्य घालावलं. समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा, यासाठी त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. त्याच दाभोलकरांना अशाप्रकरे मरण पत्करावे लागेल, हे कोणालाही वाटले नव्हते. दाभोलकरांनी बुवाबाजीचा पर्दाफाश केला होता.
युवकांचे परखड मत- सूरज मानेडॉ. दाभोलकरांनी आम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. कोणत्याही गोष्टीकडे कसे चिकित्सकपणे पाहणे, हे त्यांनी आम्हाला शिकवलं. समाजामध्ये चाललेल्या रुढीपंरपरातील अंधश्रद्धा त्यांनी कमी करीत आणली होती. धर्माचा ठेका घेणाऱ्या काही जणांच्या हातूनच दाभोलकरांचा खून झाला असावा. पोलिसांनी त्या दृष्टीनेही तपास करणे आवश्यक आहे. तरच त्यांच्या मारेकऱ्यांचा तपास लागेल. - अनिकेत कुलकर्णी दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ साताऱ्यात सुरू केली. त्यामुळे त्यांचा आपणाला अभिमान आहे. त्यांच्या मारेकऱ्यांचा अद्याप शोध लागला नाही, याचे दु:ख तर आहेच; पण तपास यंत्रणाची कीव करावी, असे वाटतेय. केवळ बुवाबाजीतून त्यांचा खून झाला असावा, या दृष्टीने तपास न करता, पोलिसांनी आणखी काही कारण त्यापाठीमागे आहे का, याचाही शोध घेतला पाहिजे. त्यांची दुश्मनी कोणाबरोबर नव्हती. - रामदास साठेदाभोलकरांचे वास्तव्य नेहमी पुण्यात असायचे. पुण्यामध्येही त्यांनी अनेक बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश केला आहे. अशा डॉक्टरांकडूनही त्यांना धोका होऊ शकतो. समाजात रुजत चाललेली अंधश्रद्धा त्यांनी मोडीत काढली. हे काहीना पटले नाही, अशा लोकांकडूनच त्यांचा खून करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जायला हवं.- राजेश ससाणे