Join us

रविवारचा दिवस प्रचाराचा...

By admin | Updated: April 13, 2015 02:50 IST

महापालिका निवडणुकीसाठी सर्व प्रभागांमधील लढतीचे चित्र शनिवारी स्पष्ट झाल्यानंतर रविवारी सर्वच पक्षांनी १११ प्रभागांमधील आपल्या प्रचारावर भर दिला

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी सर्व प्रभागांमधील लढतीचे चित्र शनिवारी स्पष्ट झाल्यानंतर रविवारी सर्वच पक्षांनी १११ प्रभागांमधील आपल्या प्रचारावर भर दिला. यात चौक सभा, कार्यालयांच्या उद्घाटनांसह रॅलींचा समावेश दिसला. यामुळे सुटीचा दिवस असलेला रविवार खऱ्या अर्थाने निवडणूक रिंगणातील तब्बल ५६८ उमेदवारांनी ‘प्रचारवार’ ठरविला. सकाळी ११.३० वाजेपर्यंत तर संध्याकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वपक्षीय उमेदवारांनी आपल्या नेत्यांसह आपापल्या पक्षाचा प्रचार घराघरांत पोहचविण्याचा प्रयत्न केला.यात सत्ताधारी राष्ट्रवादीकडून माजी मंत्री गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह महापौर सागर नाईक प्रचारात उतरलेले दिसले. नाईक कुटुंबीयांनी दिवसभरात दिघा, पावणे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, नेरूळ आणि वाशी येथील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात भाग घेतला. यात अनिल गवते, मनीषा भोईर, रवींद्र इथापे यांच्या कार्यालयांची उद्घाटने केली. काँगे्रसकडून एकही मोठा नेता रविवारी प्रचारात उतरलेला दिसला नाही. पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, अनिल कौशिक हेच स्थानिक नेते पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसले. यात रवींद्र सावंत, आंबेकर, कारंडे, विजया उघाडे, कुदळे या उमेदवारांचा प्रचार त्यांनी केला. तसेच दिघा, नेरूळ, बेलापूर येथील काही उमेदवारांच्या कार्यालयाची उद्घाटने केली. (खास प्रतिनिधी)