Join us

वाढत्या उन्हाचा मुंबईकरांना ‘ताप’

By admin | Updated: September 10, 2015 04:03 IST

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून वाढलेल्या उन्हामुळे मुंबईकरांची ‘डोकेदुखी’ वाढली असून मुंबईकरांना ताप भरला आहे. तापमानाच्या वाढीमुळे अनेकजण आजारी पडत आहेत.

मुंबई : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून वाढलेल्या उन्हामुळे मुंबईकरांची ‘डोकेदुखी’ वाढली असून मुंबईकरांना ताप भरला आहे. तापमानाच्या वाढीमुळे अनेकजण आजारी पडत आहेत. सप्टेंबर महिन्यात पाऊस पडतो. पण यंदा बदलत्या हवामानामुळे पावसाने पाठ फिरवली, तर दुसरीकडे तापमानाचा पारा ३२ वर पोहोचलेला आहे. आॅक्टोबर महिन्यातील पारा सप्टेंबरमध्येच चढल्यामुळे डोकेदुखी, डोळे लाल होणे, डोळे चुरचुरणे, ताप येणे, कणकण, लवकर दमायला होणे, घसा कोरडा पडणे, असे त्रास मुंबईकरांना जाणवू लागले आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या सात दिवसांतच तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, १ ते ७ सप्टेंबरच्या कालावधीत २ हजार ७९० तापाचे रुग्ण आढळून आले आहेत. सामान्य तापमानापेक्षा अधिक तापमान असल्यामुळे तापाचे रुग्ण वाढत आहे. मलेरियाचे १९८ तर डेंग्यूचे ३४ नवीन रुग्ण एका आठवड्यात आढळून आले आहेत. गॅस्ट्रोचे १४७, टायफॉइडचे २७, काविळीचे २३ आणि लेप्टोचे १० रुग्ण आढळून आले आहेत. यंदा पाऊस कमी झाला असला तरीही साथींचे आजार कमी झालेले नाहीत. तापमानामुळे शरीरातील पाणी कमी होण्याचा त्रास अनेकांना होतो, असे डॉक्टरांनी सांगितले. सात दिवसांत स्वाइनचे ९० रुग्ण : तापमानाचा पारा चढला असला तरीही स्वाइनच्या रुग्णांचा आकडा कमी झालेला नाही. १ ते ७ सप्टेंबरच्या कालावधीत स्वाइनचे नवे ९० रुग्ण आढळून आले आहेत. जुलै महिन्यात मुंबईत स्वाइनने डोके वर काढायला सुरुवात केली होती. जानेवारी ते आॅगस्ट दरम्यान स्वाइन फ्लूचे २ हजार ५९८ रुग्ण आढळले असून ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.