Join us  

यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक असणार - शुभांगी भुते

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 5:14 AM

यंदा उष्णतेच्या लाटांमध्ये भर पडण्याची शक्यता असून, विदर्भात उष्णतेच्या लाटांचा अनुभव येत आहे. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत उष्णतेच्या लाटा अनुभवता येण्याची शक्यता आहे.

सचिन लुंगसे

मुंबई : यंदा कोकण पट्ट्यात सरासरी तापमानाच्या तुलनेत कमाल तापमानात अधिक वाढ हाेईल. ते ३५ऐवजी ३७ अंश असेल. विदर्भातील तापमानही माेठ्या प्रमाणावर अधिक नोंदविण्यात येईल. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या नुकत्याच जारी झालेल्या अहवालानुसार तापमान वाढीस ग्लोबल वॉर्मिंग जबाबदार आहे, असे मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी जागतिक महिला दिनानिमित्त ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढेल का?यंदा उष्णतेच्या लाटांमध्ये भर पडण्याची शक्यता असून, विदर्भात उष्णतेच्या लाटांचा अनुभव येत आहे. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत उष्णतेच्या लाटा अनुभवता येण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या कालावधीत गारांचा पाऊस पडतो. उत्तरेकडून खाली वाहणारे वारे आणि बंगालच्या उपसागराकडून म्हणजेच खालून वाहणारे वारे यांच्या संघषार्मुळेच गारांचा पाऊस, अवकाळी पाऊस पडतो. अशा प्रकारचे हवामान महाराष्ट्रात पुढील दीड महिने अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. कोकणात गारा पडल्या आहेत. याचा फटका आंब्याला बसत आहे.तापमानात वाढ का हाेते?मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने मान्सूनपूर्व म्हणून ओळखले जातात. मार्च संक्रमणाचा महिना म्हणून ओळखला जातो. आपण हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे जात असतो. तापमानात मोठे बदल होतात. गरम आणि शुष्क वारे यांचा हा परिणाम असून, उष्णता दबली गेल्याने तापमानात वाढ होते. कोकणातल्या शहरांमध्ये तापमान वाढत असून,  समुद्राहून जमिनीकडे वाहणारे वारे तापत असल्याने तापमान अधिक नोंदविण्यात येते. शिवाय आर्द्रता वाढल्याने उकाडा वाढतो.हवामान केंद्रे आणि वेधशाळेचे काम कसे सुरू आहे?राज्यात २ हजार २०० स्वयंचलित हवामान केंद्रे बसविली आहेत. राज्यभरात १७ वेधशाळा कार्यरत आहेत. मुंबईत १४८ स्वयंचलित हवामान केंद्रे आहेत. मानवी पद्धतीसह यांत्रिक पद्धतीने हवामानाची नोंद घेतली जाते. जगभरात आजही मानवी पद्धतीला मोठे महत्त्व आहे. कारण यांत्रिक पद्धतीत एखादा सेंसर बंद पडला तर अडचण येण्याची शक्यता असते.डॉप्लर रडारची संख्या वाढणार आहे का?मुंबईत सध्या एक डॉप्लर रडार असून, आणखी चार सी बँड रडार लागणार आहेत. याला समुद्री रडार असे म्हणता येईल. रडारची मदत पावसाचा अंदाज वर्तविण्यासाठी होते, तर डॉप्लरची मदत चक्रीवादळाच्या अंदाजासाठी होते. आता आपण इम्पॅक्ट बेस फोर कास्ट सुरू केला आहे. म्हणजे खूप पाऊस पडणार आहे किंवा पाणी साचणार आहे, अशा प्रकारची माहिती देण्याचा वेग वाढविला आहे. 

हवामानाचे अपडेट कसे दिले जातात?मुंबईकरांना पावसाचे अपडेट्स दर पंधरा मिनिटांनी देताे. दामिनी अ‍ॅपद्वारे विजांची माहिती दिली जाते. मुंबईत कुठे जास्त पाऊस, कुठे जास्त पूर येऊ शकतो, याची माहिती दिली जाते. जिल्हा तसेच तालुका पातळीवरही हवामानाचा अंदाज दिला जाताे. हवामानाचे अपडेट्स देण्यासाठी हवामान खात्याने नि:शुल्क सेवा सुरू केली आहे. मोबाईल नंबर हवामान खात्याकडे नोंदविल्यास अपडेट मिळत राहतील. नागरिकांना आपापल्या स्तरावर हवामानातील बदलाच्या नोंदी हवामान खात्याकडे करता येतात. यासाठी हवामान खात्याची वेबसाईट पाहणे गरजेचे असून, यातली बहुतांश माहिती मराठीत आहे. 

टॅग्स :समर स्पेशल