मनोहर कुंभेजकर, मुंबई :रोमांचक व उत्कंठा वाढवणाऱ्या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रात पार पडलेल्या खासदार केसरी चषक कुस्ती-२०२५ च्या स्पर्धेत पुरुष गटातून पृथ्वीराज पाटील व महिला गटातून सुमन दहिया यांनी प्रथम क्रमांकाचा किताब पटकावला. विजेत्यांना चांदीची गदा व रोख रक्कम देऊन उत्तर पश्चिम मुंबईचे शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर व मनीषा वायकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
खासदार रविंद्र वायकर यांच्या सहकार्याने व कुस्ती राष्ट्रकुल स्पर्धा सुवर्णपदक विजेते नरसिंग यादव यांच्या मार्गदर्शनखाली रविंद्र दत्ताराम वायकर प्रतिष्ठानच्या वतीने शिवाई मैदान, अंधेरी (पूर्व) येथे खासदार केसरी कुस्ती दंगल-२०२५ चे आयोजन केले होते. या स्पर्धेत हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश, सोलापूर, सांगली, रेल्वे आखाडा, कुर्ला, जोगेश्वरी, जळगाव, सांताक्रूझ, पठाणवाडी येथील कुस्तीपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेतील आशिष हुड्डा (भारत केसरी दिल्ली अंतरराष्ट्रीय पैलवान), पृथ्वीराज पाटील (महाराष्ट्र केसरी, कोल्हापूर) तसेच कुसुम दहिया (हरियाणा केसरी), व प्रतीक्षा बागडी (महिला महाराष्ट्र केसरी, सांगली) हे स्पर्धक कुस्ती दंगल स्पर्धेच्या आकर्षणाचे केंद्र होते.
पुरुष व महिला गटात खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत पुरुषांमध्ये २४ व महिला गटात ४ सामने खेळवण्यात आले. या स्पर्धेतील बहुतांशी सामने हे अटीतटीचे झाले. कुस्तीचे हे सामने बघण्यासाठी कुस्ती प्रेमींनी एकच गर्दी केली होती.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी कुस्ती राष्ट्रकुल स्पर्धा सुवर्णपदक विजेते नरसिंग यादव, माजी खासदार गजानन कीर्तिकर, माजी नगरसेवक सदानंद परब, स्वप्नील टेंबवलकर, प्रवीण शिंदे, मनीषा वायकर, प्रियका अंबोळकर, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी राजीव चव्हाण, शाखाप्रमुख प्रकाश शिंदे, अल्ताब पेवेकर, गणेश शिंदे, ज्ञानेश्वर सावंत, डॉ. राहुल महाले, अनिरुद्ध नारकर, पूजा शिंदे, मिलिंद कापडी, उपेश सावंत, बाबू खोत, संतोष सानप, भाई मिर्लेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.